शनि शिंगणापूर देवस्थानने 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं, 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश, नेमकं काय झालं?

शनि शिंगणापूर : शनि शिंगणापूर देवस्थानने 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. हे सर्व कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्याच्या कारणावरुन काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण देवस्थानने दिलं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांचा दबाव होता. शनि देवाच्या चौथऱ्यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद सुरु झाला होता. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ काढून टाकावे अन्यथा 14 जून रोजी संपूर्ण हिंदू समाजाकडून मंदिराबाहेर मोठी रॅली काढली जाईल असा इशारा देण्यात आला होता.
मुस्लिम कर्मचाऱ्यांना हिंदू मंदिर परिसरात किंवा संबंधित संस्थांमध्ये काम करण्याची परवानगी का दिली जात आहे अशी विचारणा या संघटनांकडून केली जात होती. मुस्लिम मांसाहारी खातात आणि मंदिरात येतात असा त्यांचा आक्षेप होता.
वाद नेमका कुठून सुरु झाला
मे 2025 मध्ये, मंदिर परिसरात काही बांधकाम किंवा देखभालीच्या कामादरम्यान, मंदिरात अनेक मुस्लिम कर्मचारी काम करत असल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यांची संख्या 114 ते 300 दरम्यान असल्याचे सांगितलं होतं. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि भाजपा अध्यात्मिक मोर्चाच्या नेत्यांनी आरोप केला की या कर्मचाऱ्यांची नियुक्ती हिंदू भावना दुखावत आहे आणि मंदिराच्या सात्विकतेवर परिणाम करत आहे असा दावा केला.
21 मे 2025 रोजी मंदिराच्या व्यासपीठावर ग्रिल बसवण्याच्या कामात अनेक मुस्लिम कामगार सहभागी होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला. भाजपा अध्यात्मिक मोर्चाचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी 14 जून 2025 रोजी हिंदू समुदायाने एक मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली, ज्यामध्ये या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी केली जाणार होती.