बोअरवेल ट्रकची दुचाकीस जोराची धडक, आसोली फाट्यानजीक अपघात

माहूर : माहूर-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्याजवळ भीषण अपघात घडला असून बोअरवेल मशीनवाहक ट्रकने मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचे पाय अक्षरश: चेंदामेंदा झाले असून त्यांना गंभीर अवस्थेत यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे:
लिंगू शंकर आडे (वय २८), रा. कसारपेठ, आश्रमशाळा परिसर
संजय तुकाराम येरमे (वय २३), रा. कसारपेठ, आश्रमशाळा परिसर
दोघेही कामानिमित्त माहूरला गेले होते. परत येताना सकाळी ७ वाजेच्या सुमारास वाई बाजारकडून येणाऱ्या बोअरवेल मशीन ट्रकने त्यांच्या एमएच २६ बीआर ६३०९ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात एकाच्या उजव्या पायाचे हाड पूर्णपणे चुरडले गेले असून मांडीच्या हाडांच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत. दुसऱ्याचे उजवे हात व पायाचे बोटे तुटले आहेत. रक्तस्राव प्रचंड प्रमाणात होत असल्याने दोघांची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती.
तत्काळ मदतीला धावले:
अपघाताची माहिती मिळताच वाई बाजारचे रुग्णवाहिका चालक प्रशांत कोरे यांनी तात्काळ दोघांना माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तेथे डॉ. विपीन बाभळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचार करून जखमींना यवतमाळला रेफर केले. एक रुग्णवाहिकेत तर दुसऱ्यावर दवाखान्याच्या बाहेरच प्राथमिक उपचार करून लगेच हलविण्यात आले.
108 ॲम्बुलन्स नादुरुस्त, नागरिकांमध्ये संताप:
दरम्यान, माहूर ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे अपघातग्रस्त किंवा गंभीर रुग्णांना बाहेरगावी हलवताना अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, माहूर रुग्णालयात किमान दोन 108 ॲम्बुलन्स उपलब्ध कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
प्रतिनिधी – गोपाल चव्हाण