LIVE STREAM

Latest NewsYavatmal

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं,यवतमाळतील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

केदारनाथ : केदारनाथमध्ये आज पहाटे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पायलटसह ७ भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमधील ३ जण महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये रविवारी भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेमध्ये पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ३ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही केदारनाथला दर्शनासाठी गेले होते. पहाटेच्या सुमारास देवदर्शनासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत आणखी काही भाविक होते. त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे राहणाऱ्या जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, काशी राजकुमार जयस्वाल अशी या मृतांची नावं आहेत. राजकुमार जयस्वार हे पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीसोबत १२ जून रोजी वणी इथून केदारनाथसाठी गेले होते. पण देवदर्शन करण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि अख्ख्या कुटुंबाचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला.

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी पहाटे भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं. केदारनाथ मार्गावर हे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण होते. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. खराब हवामानामुळे गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हेलिकॉप्टरला अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याची माहिती समोर आली.

UCADA ने एक प्रेस रिलीज जारी केली आहे ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, रविवारी पहाटे ५:१७ वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे भाविकांना घेऊन निघाले होते. वाटेत खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळावर बचाव पथक दाखल झाले. सर्वांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर हेलिकॉप्टरचे तुकडे-तुकडे झाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!