LIVE STREAM

AmravatiCrime NewsLatest News

जिल्ह्यातील एसटी बसस्थानके असुरक्षित! महिला प्रवासी ठरतायत सॉफ्ट टार्गेट, सोन्याचे दागिने व पर्स लंपास

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील एसटी बसस्थानकांमध्ये गेल्या काही महिन्यांत प्रवासी महिलांवर चोरट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, पर्स आणि रोख रक्कम लंपास करण्याच्या सुमारे ५० घटनांनी जिल्हा हादरला आहे.

अलीकडेच अंजनगाव सुर्जी येथील नवीन बसस्थानक परिसरात १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ६.१९ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. पीडित प्रीती देशमुख या चांदूर बाजार लग्नासाठी जात होत्या, आणि गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर डल्ला मारला.

याशिवाय, राजापेठ बसस्थानकातून यवतमाळकडे जाणाऱ्या एका महिलेसोबतही चोरीची घटना घडली. ७.६६ ग्रॅम सोन्याची साखळी व २,००० रुपये रोख लंपास करण्यात आले. या घटना १२ जून रोजी नोंदवण्यात आल्या.

गर्दीचा फायदा घेणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट
चोरटे विशेषतः बसमध्ये चढताना किंवा तिकीट काढताना गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या पर्स, दागिने आणि मोबाइल चोरण्यात निष्णात झाले आहेत. काही पुरुष प्रवाशांचेदेखील खिसे कापून रक्कम चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.

सीसीटीव्ही बंद, पोलिसांचा अभाव – सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
शहर आणि ग्रामीण बसस्थानकांमधील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. पोलीस किंवा सुरक्षा रक्षकांच्या अनुपस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, काही बसस्थानकांवर पोलिस चौकी असूनही घटनांचा ओघ काही थांबलेला नाही.

पोलीस अधीक्षकांनी दिले आदेश
वाढत्या घटनांवर लक्ष ठेवत पोलीस अधीक्षक विशाल आनंदा यांनी सर्व ठाणेप्रमुखांना आपल्या हद्दीतील बसस्थानकांवर गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिनिधी – नितेश किल्लेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!