Latest Newsmelghat
धारणीत बिकट परिस्थितीत सात खांबांची वीज वाहिनी पुन्हा उभी; महावितरणच्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश
धारणी : डाबका उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीचे ७ खांब तुटल्याने,वाहिनी विस्कळीत होऊन ३३ केव्ही डाबका उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता.तथापि वाहतुकीसाठी अडचण असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज खांबाचे वहन केले आणि युद्धपातळीवर काम करत अवघ्या काही तासांतच ही वाहिनी उभारून ३३ केव्ही डाबका उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरू केला.
धारणी तालुक्यातील दूरस्थ भागात दिनांक १२ जून रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे वीज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळामुळे अनेक ठिकाणी वीज खांब जमीनदोस्त झाल्यामुळे ३३ केव्ही धारणी उपकेंद्र,३३ केव्ही डाबका उपकेंद्र आणि ३३ केव्ही गोंडवाडी उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता.त्यामुळे या उपकेंद्रावरून विजपपरवठा होणाऱ्या जवळपास १७० गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
मुख्य अभियंता यांचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे आणि उपकार्यकारी अभियंता श्याम येनगंटीवार यांच्या पुढाकाराने वादळ थांबताच महावितरणच्या कामाला टप्प्या -टप्प्याने सुरूवात केली,पहिले ३३ केव्ही वीज वाहिन्या उभ्या केल्यात,त्यांनतर ११ केव्ही वाहिन्या आणि नंतर लघुदाब वाहिन्यावरील अडथळे दूर करत तीनही उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरू केला.परंतू १२ जूनला मध्यरात्री पुन्हा झालेल्या वादळामुळे डाबका उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीचे ७ विजेचे खांब पडल्यामुळे ३३ केव्ही डाबका उपकेंद्र आणि त्यावरील ३७ गावे अंधारात गेली, दुसऱ्या दिवशी महावितरण कर्मचारी व कंत्राटदार एजन्सींच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवसभरात विजेचे खांब उभे करून ३३ केव्ही वाहिनी पुन्हा उभी केली,परंतू रात्र झाल्यामुळे त्या वाहिनीवर वीज वाहिन्या ओढण्यास अडथळे निर्माण झाल्यामुळे काल (१४ जून) ला वीज पुरवठा सुरू केला.
३३ केव्ही डाबका उपकेंद्रातून ११ सुसार्दा,११ केव्ही चेंडो आणि ११ केव्ही नारदू या तीन वाहिन्यांच्या माध्यमातून ३७ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो.
प्रतिनिधी : राजेश मालवीय