विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह

अहमदाबाद – गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले. हा अपघात इतका भयंकर होता की, विमानातील प्रवाशांचे मृतदेह ओळखणेही कठीण होते. त्यामुळे पीडितांच्या कुटुंबाला डीएनए नमुने देण्यासाठी हॉस्पिटलला बोलावले होते. आज या अपघातात बळी पडलेले विजय रुपाणी यांचे डीएनए नमुने जुळले आहेत. गृहमंत्री हरश संघवी यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी विजय रुपाणी यांचा मृतदेह कुटुंबाला सोपवला जाणार आहे.
विजय रुपाणी एअर इंडियाच्या त्याच फ्लाईटमधून प्रवास करत होते जे अहमदाबादहून लंडनला चालले होते. रुपाणी लंडनला मुलाकडे जात होते परंतु त्यांचे विमान टेकऑफ घेताच काही मिनिटांतच खाली कोसळले. या विमानात २४२ लोक होते. त्यातील २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकमेव प्रवासी सुखरूप बचावला. या दुर्घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
या दुर्घटनेतील मृतदेह कुटुंबाला सोपवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. राज्य सरकारकडून पीडित कुटुंबाला योग्य ती मदत केली जातेय असं हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी म्हटलं. गुरुवारी ही दुर्घटना घडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये २५० हून अधिक डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वयंसेवकांच्या टीमने तात्काळ बचाव कार्य सुरू केले. हे विमान ज्या इमारतीला धडकले तिथेही बरेच जण जखमी झाले होते. त्यांनाही वेळीच उपचार मिळाल्याने काहींचा जीव वाचला. सध्या डिएनए चाचणीच्या मदतीने मृतदेह पीडितांच्या कुटुंबाला सोपवण्याचे काम सुरू आहे.
उड्डाणानंतर सात मिनिटांत अपघात
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने गुरुवारी दुपारी १.३९ वाजता उड्डाण केले होते. अवघ्या सात मिनिटांत, म्हणजे १.४६ वाजता, विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर काही क्षणातच विमानाने ‘मेडे कॉल’ पाठवला आणि काही मिनिटांतच विमान मेघाणी नगर भागातील एका इमारतीजवळ कोसळले. या विमानात २३० प्रवासी, १० केबिन क्रू आणि २ पायलट होते. विमान कोसळल्यानंतर परिसरात तीव्र स्फोटाचा आवाज झाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. अपघातानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये घटनास्थळी विखुरलेले मृतदेह, विखंडित अवस्थेत विमानाचे अवशेष आणि परिसरात माजलेला हाहाकार दिसून येत होता.