बडनेरा येथे अभ्यासिकेच्या कामाला विलंब; कार्यकर्त्यांचा आमरण उपोषणाचा इशारा
बडनेरा : माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज – शाहू – फुले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे काम अद्याप सुरू न झाल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भूमिपूजनाला तब्बल सहा महिने उलटून गेले असूनही कोणतीही बांधकाम प्रक्रिया सुरू झाली नसल्याने, आता आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
५० लाखांची योजना, पण काम सुरू नाही
बडनेरा येथील प्रभाग क्रमांक २२ मधील आठवडी बाजार परिसरात, भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा यांच्या मागणीनुसार आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अभ्यासिकेचे भूमिपूजन केले होते. या योजनेसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे बोलले जाते. मात्र, निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झाल्यानंतरही कामाची कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन इशारा
सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी स्पष्ट केले की, “महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना जर अभ्यासिकेच्या कामास सुरूवात झाली नाही, तर आम्ही आमरण उपोषण करू. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे काम रखडण्याची शक्यता आहे.”
भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा
या मागणीला भारतीय बौद्ध महासभेचे सचिव दरीया गायकवाड यांनीही पाठिंबा दिला आहे. यावेळी महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर, कोषाध्यक्ष कपिल डोंगरे, प्रकाश दातार, महेंद्र बागडे, हितेश मेश्राम, सुरेश बनसोड, अजय भालेराव, आकाश मेश्राम आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्रश्न अनुत्तरित – काम कधी सुरू होणार?
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या अभ्यासिकेच्या कामावर अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी दिलेल्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यावर काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.