देवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उन्हाळी शिबिर उत्साहात; विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग

देवरा : अमरावती जिल्ह्यातील देवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शैक्षणिक शिबिर सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शाळेतील परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
नवीन उपक्रम, नवे कौशल्य – विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
इयत्ता दुसरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन या शिबिरात गणित, इंग्रजी यांसारख्या विषयांबरोबरच योगा, नृत्य, प्राणायाम, विज्ञान विषयातील चंद्रयान-३ प्रकल्प, गावाचा नकाशा तयार करणे असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण होत असून, त्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
कागदापासून तयार शैक्षणिक प्रकल्पांचे आकर्षण
शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कागदापासून विविध शैक्षणिक प्रकल्प तयार केले असून, हे प्रकल्प पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थही मोठ्या संख्येने येत आहेत. विद्यार्थ्यांचे सादरीकरण, आत्मविश्वास आणि नावीन्यपूर्ण कल्पकता पाहता येते आहे.
मुख्याध्यापिकांचे मत
या उपक्रमाविषयी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका कु. प्रतिभा चांदुरकर म्हणाल्या, “या उन्हाळी शिबिरामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर अनुभवातून शिकण्याची संधी मिळत आहे. अशा उपक्रमांची राबवणूक ही काळाची गरज असून, शासनाने याचा अधिकाधिक विस्तार करावा.”
प्रतिनिधी: गजानन खोपे