परतवाडा-अमरावती मार्गावर भीषण अपघात: ट्रक व ऑटोची धडक एकाचा जागीच मृत्यू

अचलपूर – परतवाडा-अमरावती मुख्य मार्गावरील पूर्णा नगर परिसरात आज सकाळी सुमारास ट्रक आणि ऑटोमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत निंबारी येथील नमन गोपाळराव सगणे (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला असून ऑटोचालक यश धनराज गोळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटना सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की ऑटोचे पुढील भाग अक्षरशः चुरडून गेले. मृतक नमन सगणे हे अचलपूर तालुक्यातील निंबारी येथील रहिवासी असून, त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताचे कारण: खराब रस्ता आणि मोठे खड्डे
सदर अपघाताला परतवाडा-अमरावती मार्गावरील मोठे आणि धोकादायक खड्डे हे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या रस्त्याची दुरवस्था ही वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत असून आजच्या घटनेने प्रशासनाच्या दुर्लक्षावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
आसेगाव पोलीस तपासात
घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्रतिनिधी : नितेश किल्लेदार