वासेवाडी येथील पेढी नदीत अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाची कारवाई; ट्रक-ट्रॉली जप्त

भातकुली : भातकुली तालुक्यातील वासेवाडी येथील पेढी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. १८ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने तालुक्यात विशेष भरारी पथक तैनात केले असून, ही कारवाई त्या मोहिमेचा भाग होती.
जप्त वाहन तहसील कार्यालयात दाखल
जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली पुढील दंडात्मक कारवाईसाठी भातकुली तहसील कार्यालयात नेण्यात आले आहे. महसूल विभागाने यापुढेही अशा अवैध उत्खननांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कारवाईत अधिकारी उपस्थित
कारवाईदरम्यान ग्राम महसूल अधिकारी एस.एस. गील, मनोज बेले, विजय दुधे, संदीप निरगुडे, महसूल सहाय्यक रवींद्र खांडेकर व निलेश भातजोडे हे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर याविरोधात जनतेमध्ये संताप व्यक्त होत असतानाच महसूल विभागाची ही तातडीची कारवाई महत्त्वाची ठरली आहे.
प्रतिनिधी: गजानन खोपे