LIVE STREAM

Latest NewsYavatmal

हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या जयस्वाल पती-पत्नी व चिमुकलीवर वणी येथे अंत्यसंस्कार

वणी : केदारनाथजवळ १२ जून रोजी पहाटे घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू पावलेले वणी येथील कोळसा व्यावसायिक राजकुमार उर्फ राजा जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची २३ महिन्यांची चिमुकली काशी यांच्यावर आज वणी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयस्वाल कुटुंबाच्या अंत्ययात्रेला संपूर्ण शहराने अश्रूंनी निरोप दिला. त्यांच्या निवासस्थानावरून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये तिघांची अंत्ययात्रा काढण्यात आली. नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

राजकीय आणि प्रशासकीय उपस्थिती

अंत्ययात्रेत खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. याशिवाय एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर आणि पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

एक कुटुंब काळाच्या महाभयानक घटनेत गमावलं

९ जून रोजी जयस्वाल कुटुंब चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडला गेले होते. केदारनाथहून गुप्तकाशीकडे परतीच्या वाटेवर असताना १२ जून रोजी सकाळी ५.२० वाजता त्यांचे हेलिकॉप्टर हवामानामुळे गौरीकुंडजवळ जंगलात कोसळले. या अपघातात पती-पत्नी व चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले साडू प्रविण महाजन व मेहुणी पूजा महाजन दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये असल्यामुळे सुदैवाने बचावले.

नागपूरमार्गे मृतदेह वणीला पोहोचले

रुद्रप्रयाग (उत्तराखंड) येथून दिल्ली, दिल्लीहून नागपूर व त्यानंतर सकाळी ८.३० च्या सुमारास तिघांचे मृतदेह वणी येथे आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी मृतदेह ठेवण्यात आले होते. सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघाली व ११ वाजता मोक्षधाम येथे तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती-पत्नीला मुखाग्नी देण्यात आला, तर चिमुकली काशी भूमातेच्या कुशीत विसावली.

शहरभर शोकाची लाट

वणी शहरातील सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात मोठ्या आदराने पाहिले जाणारे राजकुमार जयस्वाल आणि त्यांचे कुटुंब आपल्या मनमिळावूपणामुळे प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!