मेळघाटातील एसटी बससेवा ठप्प – प्रवाशांचे हाल सुरूच!

धारणी :- धारणी बस स्टॉपवर पुन्हा एकदा एसटी महामंडळाची बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया, मेळघाटातील लोकांच्या प्रवासाचा संघर्ष आणि प्रशासनाचे दुर्लक्ष!
धारणी तालुक्यातील नागपूर-भोकरबर्डी (MH 40/CM 6292) क्रमांकाची बस धारणी बस स्टॉपवर प्रवासी बसताच बंद पडली. बसचे इंजिन लोड घेत नसल्याने वाहकाने प्रवाशांना उतरवून दिले. यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे.
नागपूर-इंदूर मार्गावर चालणाऱ्या बसेसही वारंवार बिघडत असून, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धारणी तालुक्यातील नागरिकांना अमरावती, परतवाडा आणि नागपूर येथे जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत.
याचा सर्वाधिक फटका शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण आणि मेळघाटातील गरीब जनतेला बसत आहे. अत्यावश्यक सेवेचा भाग असलेल्या या बस सेवा सुधारल्या जात नसल्याने संतप्त प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आमदारांनी नागपूर येथील डेपो कंट्रोलरकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र परिस्थिती जैसे थे आहे. या जुन्या आणि खराब बस कधी बदल्या जाणार? प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जाणार की नाही? हा मोठा प्रश्न आहे.
मेळघाटातील प्रवाशांचे हाल सुरूच आहेत, पण यावर ठोस उपाययोजना कधी होणार? प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायचं की जुन्या गाड्यांनीच त्यांची परीक्षा बघायची? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.