वीर वामनरावमध्ये अवतरले बाल शिवराय
अमरावती :- श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित, वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत संस्थेचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा, डॉ.सौ.माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार व समस्त कर्मचारी वृंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शाळेत सातत्याने नवनवीन अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन करीत असतात.
विद्यार्थ्यांच्या बालमनावर बालपणातच जे संस्कार प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेच्या माध्यमातून कोरले जातात ते विद्यार्थ्यांच्या मनावर, त्यांच्या स्मृती पटलावर संपूर्ण आयुष्यभर कायमरित्या टिकून राहतात. त्याकरिताच सर्व थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत विशेषरित्या करून थोर पुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या बालमनावर बिंबविण्याचा पूर्ण प्रयत्न शाळेतर्फे केल्या जातो.
नुकतेच शाळेत शिवजयंतीचा कार्यक्रम विद्यार्थी व पालकांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार, ज्येष्ठ शिक्षिका मोनिका पाटील व पालकांमधून मोहिनी राऊत यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी इयत्ता दुसरीतील चि. भाग्य मोहन राऊत या विद्यार्थ्याने बाल शिवरायांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती. त्याच्या आई मोहिनी राऊत यांनी अतिशय काटेकोरपणे तयारी करून त्याला यावेळी शाळेत आणले होते. भाग्य सोबतच ” मला सुद्धा जिजामातेची वेशभूषा परिधान करून शाळेत यायचे होते, परंतु ते यावेळी शक्य झाले नाही. पुढच्या वेळेस मात्र आम्ही दोघेही माय- लेक बाल शिवराय व मासाहेब जिजामाता यांची वेशभूषा परिधान करून एखाद्या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ.”अशा प्रकारची प्रतिक्रिया सौ.राऊत यांनी मुख्याध्यापकांच्या जवळ कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. शाळेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये पालकांचे असेच उत्साह पूर्ण सहकार्य सदैव मिळत राहते.
माही अतुल बगेकर,कनक विजय झांझोटे,नियती विक्रम डेंडुले,आनंदी गोविंद सारवान, ओजस्वी दिगंबर वरघट या विद्यार्थिनीं यावेळी जिजामातेची वेशभूषा परिधान करून आल्या होत्या. शिवरायांच्या जीवन चरित्रावर आधारित पोवाडे विद्यार्थ्यांना यावेळी ऐकविण्यात आले. शाळेचे शिक्षक सुजित खोजरे यांनी शिवरायांचा खडतर व प्रेरणादायी जीवन प्रवास आपल्या भाषणामधून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सावरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनीषा श्रीराव, पल्लवी बिजवे, विलास देठे, अमोल पाचपोर चित्रा विघे, सीमा काळे, ईश्वर हेमने, मोहम्मद अन्सार यांनी परिश्रम घेतले.