LIVE STREAM

India NewsLatest News

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे

भाषा ही आपली ओळख, अस्मिता, आणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले. मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली.

राजधानीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत गेले तीन दिवस सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सायंकाळी झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, लोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, निमंत्रक संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा यांच्यासह साहित्य महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

जे जे मराठी, ते ते जोपासण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी  – श्री. शिंदे

मराठीला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून साहित्यिक, विचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याच्या कारभारात मराठीचा वाढता वापर होत आहे. सर्वसामान्यांच्या व्यवहार व शिक्षणात मराठीचा वापर वाढण्याची गरज आहे. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावे मराठी अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपये दिले असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. राज्य सरकारने राज्यातल्या ग्रंथालयांना अनुदान वाढवून दिले आहे. नवलेखकांकडून कथा, कादंबरी, कवित या सर्वच क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यामधून वर्तमानाचा वेध घेवून आजच्या पिढीचे प्रश्न मांडण्याचे धाडस केले जात आहे. या लेखकांच्या साहित्याची दखल घेण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे. मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन केले जावे, अशी सूचना करतानाच रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठासाठी पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीतील विविध साहित्यप्रवाहांचा संगम आहे. महाराष्ट्राच्या भूमीत संतांनी भक्ती संप्रदाय निर्माण केला, तर, वीरांनी शक्ती संप्रदाय निर्माण केला. विविध लोककलांनी मराठी भाषा समृद्ध होत गेली. आता मराठी भाषेच्या अभिजातपणाचा सूर्य उगवलेला आहे, त्याचा प्रकाश सर्वत्र पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मराठीचा वेलू गगनावरी नेण्यासाठी जे जे मराठी, ते ते जोपासण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन करून श्री. शिंदे म्हणाले, मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण टोकाचे आग्रही असले पाहिजे. विविध घटकांच्या एकत्रिकरणातून मराठी संस्कृती आणि समाज तयार होतो. तो टिकविण्यासोबतच वाढविला पाहिजे. दोन वर्षांनी 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. येत्या दोन वर्षात मराठीने भाषेने गरुड झेप घ्यावी, मराठी ही आई, ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, बहिणाबाई, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी सर्वांचीच भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत झालेले हे संमेलन दीर्घकाळ स्मरणात राहील, असे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!