गोल्डन कार्ड प्रक्रियेत अडथळे, वाठोडा शुक्लेश्वर येथील नागरिकांची गैरसोय

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना गोल्डन कार्ड आवश्यक आहे. मात्र, वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात हे कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची मात्र मोठी अडचण झाली आहे. सर्व्हरच्या सततच्या समस्यांमुळे लोकांना अनेक तास वाट पाहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
“भातकुली तालुक्यातील खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील उपकेंद्रात सकाळपासूनच नागरिकांनी गोल्डन कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी केली. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने नागरिकांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले. काहींना तासन्तास थांबूनही कार्ड मिळाले नाहीत.
आरोग्य विभागाकडून या योजनेची मोठी जाहिरात केली जाते, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांचे नावे ऑनलाईन लिस्टमध्येच नाहीत, त्यामुळे त्यांना गोल्डन कार्ड मिळत नाही. नागरिकांनी आरोग्य विभागाकडे याबाबत लेखी तक्रार केली असून त्वरित सर्वे करून लिस्ट अपडेट करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सर्व्हर समस्या लवकरच सोडवली जाईल. तसेच, ज्या नागरिकांची नावे ऑनलाईन यादीत नाहीत, त्यांच्यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाईल.’ मात्र, अनेक नागरिकांचा रोष अजूनही कायम आहे.
“सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा तर सामान्य नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गोल्डन कार्ड प्रक्रियेत असलेल्या अडचणींवर तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष अधिक वाढू शकतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.