Latest NewsMaharashtra Politics
दलाल पीए आणि ओएसडी नेमणूक करणारे 13 मंत्री शिंदे गटाचे, संजय राऊतांचे गंभीर आरोप

मुंबई : नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना संजय राऊत दिसले. आता संजय राऊत यांनी मोठा खुलासा केलाय. संजय राऊत म्हणाले की, अनेकदा उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांच्या चुका आपल्या पोटात घेतल्या. आम्ही त्यांना अनेकदा सांगायचे आपल्याला त्रास होईल. हे सगळे लोक एकनाथ शिंदेंसोबत आहेत. मग ते त्यांच्या विकृत अवस्थेत अशाप्रकारची वक्तव्य करतात. या सर्वांना माननीय उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांनी भरभरून दिले आहे. त्यात आम्ही सुद्धा आहोत, सर्व.
समर्थ रामदासांनी मुर्खाची जी दहा लक्षणे सांगितले आहेत ती सर्व लक्षणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांमध्ये दिसतात. आता मुर्खांकडून दुसरी काय अपेक्षा करायची. पुढे राऊत म्हणाले, आता तुम्ही गेलात ना...मग तिकडे तुमचे काम करत राहा...काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मंत्र्याला पीए आणि ओएसडीच्या विषयावरून दम दिला. पीए आणि ओएसडी नेमण्याबद्दल मंत्र्यांकडून जी यादी आली, त्यात 16 जण दलाल आणि फिक्सर आहेत.
माझी मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे की, कोणत्या मंत्र्यांनी पीए आणि ओएसडीच्या नावामध्ये फिक्सर आणि दलालांची नावे पाठवली ते जाहीर करा. माझ्या माहितीप्रमाणे ही नावे पाठवणारे तेरा मंत्री हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत आणि उरलेले अजित पवारांचे आहेत. शिंदेंचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. मी मागे पण बोललो अजित पवारांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत. त्यांना माहिती आहे की, महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत. काहींनी गेल्या अडीच वर्षात इतके जास्त पाप केले की ते गेले.
भारतीय जनता पक्षाच्या आजुबाजूला कुठेही नैतिकता तुम्हाला फिरताना दिसणार नाही. प्रतिष्ठा, स्वाभिमान अजिबात नाहीये. आत्मसन्मानाची गोष्ट पवार साहेबांनी केली आहे. या सरकारला कोणताच आत्मसन्मान नाहीये आणि सरकारमध्ये जे मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, खुनाचे आरोप आहेत, त्यांच्याकडे ते असण्याची शक्यताच नाही. आमच्या पक्षाची, आमच्या चिन्हाची सुप्रीम सुनावणी न करताच न्यायाधिश साहेब पळून गेले, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.