महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई, अमरावती ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावर्ती गावांतील अवैध हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त केले

“महाशिवरात्री निमित्त नियोजित सालबर्डी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली असून, महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २७ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन मोर्शी आणि मध्यप्रदेशच्या मासोद पोलीस चौकीच्या संयुक्त पथकाने घोडदेव, झुनकारी, पांढरघाटी आणि रोहणा परिसरात अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर मोहफुलाचा सडवा आणि गावठी दारू जप्त केली. पोलिसांनी कारवाईदरम्यान २०० लिटर क्षमतेचे ८३ प्लास्टिक ड्रम, ज्यामध्ये अंदाजे १६,६०० लिटर मोहसडवा होता, तसेच ७० लिटर क्षमतेचे १५ टायर ट्यूब आणि १२ फूट बाय २० फूट सिमेंट टाकीतील सुमारे ८५०० लिटर मोहसडवा नष्ट करण्यात आला. याचा एकूण बाजारमूल्य २७ लाखांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि मोर्शी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, अमोल युरकुल आणि त्यांच्या पथकाने धडक कारवाई केली. यामध्ये मध्यप्रदेशच्या मासोद पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. ही कारवाई आगामी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा अवैध दारू अड्ड्यांमुळे यात्रेच्या काळात अनेक समस्या निर्माण होतात. पोलिसांच्या तडाखेबंद कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलिसांनी अशा प्रकारची कठोर कारवाई पुढेही सुरू ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत.”
“तर अमरावती ग्रामीण पोलिसांनी महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत अवैध दारू धंद्यावर मोठा आघात केला आहे.
अशा धडक मोहिमांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल.