‘मर्सिडिज गाडीच नव्हे तर वहिनींची रेशमी साडी…’; उद्धव यांचा ‘BMC टक्कापुरुष’ उल्लेख करत टीका

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या गंभीर आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. शिवसेनेमध्ये 2 मर्सिडिज दिल्यानंतर पद मिळतं, असं विधान गोऱ्हेंनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन केल्यानंतर यावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. असं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या तसेच पक्ष प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख 'बीएमसी टक्कापुरुष' असा करत निशाणा साधलाय. थेट रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी टीका केली आहे.
वहिनींची रेशमी साडीसुद्धा…
डॉ. ज्योती वाघमारे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘मातोश्री’ची काळी बाजू उजेडात आणल्यानेच बीएमसी ‘टक्कापुरुष’ उद्धव ठाकरेंना बसला धक्का आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. “नीलम ताईंनी ‘मातोश्री’ची काळी बाजू उजेडात आणल्याने ‘बीएमसी’चे ‘टक्कापुरुष’ उद्धव ठाकरेंना भलताच धक्का बसला आहे. मर्सिडिज गाडीच नव्हे तर आदुबाळाची बाबागाडी सुद्धा ‘बीएमसी’च्या टक्क्यांमधून येत होती हे खरे आहे का?” असा सवाल वाघमारे यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना, “गाडीच नव्हे तर ‘मातोश्री-2’ ची माडी, मोठे मन नसतानाही मोठ्या काठाच्या साड्या नेसणाऱ्या वहिनींची रेशमी साडीसुद्धा पदाधिकाऱ्यांकडून खंडण्या गोळा करून घेतली जात होती हे जुन्या लोकांकडून आम्ही ऐकलंय,” असं ज्योती वाघमारेंनी म्हटलं आहे.
तुम्हाला 'खोके' नाही 'कंटेनर' लागतात
“महाराष्ट्रात ऊन वाढले की गुलाबी थंडीची मजा घ्यायला तुम्ही जाता त्या लंडनमधल्या प्रॉपर्ट्या कशा झाल्या हे महाराष्ट्राला सांगणार का? वयाच्या तिशीतच कोणतीही नोकरी उद्योग न करता आदित्य ठाकरेंकडे करोडोची मालमत्ता कशी आली याचा हिशेब जनतेला देणार का?” असा सवालही ज्योती वाघमारेंनी उपस्थित केला आहे. तसेच, “राणे साहेब म्हणतात तुम्ही ‘लेना’ बँक आहात, राजसाहेब म्हणतात तुम्हाला ‘खोके’ नाही ‘कंटेनर’ लागतात,” असा टोला ज्योती वाघमारेंनी लागवला आहे.
गाड्या कोणाच्या नावावर?
“तुम्ही आणि तुमची लेकरे ज्या महागड्या परदेशी बनावटीच्या गाड्या उडवता त्या नक्की कोणाच्या नावावर आहेत याचा खुलासा करणार का?” असा सवालही ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. तसेच, “थिएटरच्या बाहेर सिनेमाच्या तिकिटं सौ दो सौ करत विकावीत तशी तिकिटांची दलाली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये चालते असा आरोप अनेकांनी केलाय यातील सत्य काय ते कधी सांगणार?” असंही ज्योती वाघमारेंनी म्हटलं आहे.