गर्दी, चेंगराचेंगरीचा विषय असेल तर..’, त्र्यंबकेश्वर मंदिरातील नृत्य वादावर प्राजक्ता माळीने सोडलं मौन!

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळीला नृत्यासाठी आमंत्रिक करण्यात आले. पण महाशिवरात्रीच्या आधीच हा कार्यक्रम वादात सापडला आहे. प्राजक्ता माळीचा कार्यक्रम ठेवू नये, अशी मागणी मंदिर व्यवस्थापनाला करण्यात आली. दरम्यान या सर्व वादावर प्राजक्ता माळीने प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण?
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्र्वस्तांच्या वतीने प्राजक्ता माळीच्या नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ता माळी यांचा ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आता त्याच्याविरोधात आवाज उठवण्यात आल्याने हा कार्यक्रम चर्चेत आला. मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. यापूर्वी सेलिब्रिटी इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, असं ललिता शिंदेंनी पत्रात म्हटलं आहे. तसेच या पत्रामध्ये ललिता यांनी प्राजक्ता माळी वादग्रस्त व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या नृत्याविष्कारा कार्यक्रमाला विरोध असल्याचंही म्हटलं आहे. या माध्यमातून चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी असल्याचं पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असंही ललिता यांनी म्हटलं आहे. यासर्वावर आता प्राजक्ता माळीनेदेखील मौन सोडले आहे.
काय म्हणाली प्राजक्ता माळी?
त्र्यंबकेश्वर मंदिरातील नृत्यासंदर्भात सुरु असलेल्या वादावर प्राजक्ता माळीने व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात असताना त्र्यंबकेश्वर मंदीर ट्रस्टकडून फोन आला. आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर आधारित महोत्सव, कार्यक्रम आयोजित करत असतो. फुलवंतीच्या निमित्ताने आम्हाला कळलं की तुम्हीदेखील भरतनाट्य नर्तिका आहात. तर यंदा तुमच्या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रम कराल का? अशी विचारणा मला करण्यात आली होती, असे ती म्हणाली. सर्व नृत्यकर्मींसाठी नटराज ही आराध्यदेवता आहे. मी अजिबात वेळ न दवडता त्यांना हो असं कळवल्याचे तिने सांगितले.
अपुऱ्या माहितीमुळे गैरसमज
महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित नृत्याचा आहे. मी भरतनाट्य नर्तिका आहे. मी नृत्यात विषारद अलंकार केलंय. बीए एमए केलंय. अपुऱ्या माहितीमुळे कुणाचा गैरसमज झाला असेल तर मनातील किंतु परंतु काढून टाकावे. समाजाची दिशाभूल करु नये,असे आवाहन प्राजक्ता माळीने केलंय.
मी 2 रचना सादर करेन
देवाच्या दारामध्ये कोणी सेलिब्रिटी नसतो. सर्वजण भक्त असतात. त्याच भक्तीभावाने नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटाराजाच्या चरणी अर्पण करणार आहेत. शिवार्पणवस्तू असं कार्यक्रमाचं नाव आहे. मी 2 रचना सादर करेन. बाकीच्या रचना माझे सहकलाकार सादर करतील, असेही स्पष्टीकरण तिने दिले आहे.
गर्दी आणि चेंगराचेंगरीचा विषय असेल तर…
गर्दी आणि चेंगराचेंगरीचा विषय असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो निर्णय घेतील तो सामाजिक भान बाळगत सर्वांना बंधनकारक असेल आणि सर्वांना मान्य असेल. पण कार्यक्रमाचे स्वरुप हे शास्त्रीय नृत्य असेल, असे प्राजक्ता माळीने म्हटले.