LIVE STREAM

Latest NewsMaharashtraMaharashtra Politics

शरद पवार गटाला मोठ्ठं भगदाड पडणार? विधानसभा लढवलेले नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत

मुंबई :- राज्याच्या राजकारणात लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा विधानसभेचे उमेदवार राहुल मोटे, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेतील अपक्ष उमेदवार राहुल जगताप तसेच परभणी मधील सेलू जिंतूर येथील विजय भांबळे हे शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली जोरदार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता पुन्हा एकदा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना मोठा धक्का देणार असल्याच्या चर्चा आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र, या नेत्यांच्या प्रवेशावरून विरोध सुरू झाला आहे. तर दुसरीकडे महायुती मित्र पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवलेले विरोधक उमेदवारांना थेट अजित पवार पक्षात घेत ताकद देत असल्याने देखील मोठ्या प्रमाणात महायुतीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. अजित पवार स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेकांना परत पक्षात समावून घेऊ पाहत आहेत. यामुळे परत एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार अंतर्गत राजकीय स्पर्धा वाढू लागली आहे.

कोणते नेते जाण्याच्या तयारीत?

शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा विधानसभेचे उमेदवार राहुल मोटे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार पार्टीकडून शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दुसरीकडे भाजपाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विजय भांबळे यांनी सेलू जिंतूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल जगताप यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या विरोधात बंडखोरी केली आणि जगताप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, या मतदारसंघात भाजपाचे विक्रम पाचपुते विजय झाले आहेत. सध्या हे नेते पक्ष प्रवेशाच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

जयंत पाटील भाजपच्या वाटेवर जोरदार राजकीय चर्चा

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक तास भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटलांनी बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून त्यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. पण ही भेट रात्री 8 वाजता झाली आणि ती मतदारसंघातील कामासंबंधी होती अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. तर जयंत पाटलांनी घेतलेली ही भेट व्यक्तिगत कामासाठी असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. या भेटीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात महसूल विभागाशी संबंधित काही कामांसाठी आपण बावनकुळेंची भेट घेतली. त्यांना वेगवेगळ्या विषयांची निवेदनं दिली.

भेटीनंतर काय म्हणाले जयंत पाटील?

“सोमवारी संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नांवर मी त्यांना 10 ते 12 निवेदनं दिली आहेत. ती निवदेनं देण्यासाठीच मी त्यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. महसूल विभागात काही गोष्टी ऑनलाइन केल्या आहेत, त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो आहे. त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते. मला 6 वाजण्याची वेळ दिली गेली होती. आमच्यात 25 मिनिटं चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटीलही होते. आमची कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. मी इतर चर्चा कुठलीही केलेली नाही. मी त्यांना निवेदनं दिली आहेत. मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन त्यांना भेटलो”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!