बिल भरलं नाही, पाणी कापू का? पुण्यात ग्राहकांना बनावट मेसेज, फाईल डाऊनलोड करताच बँक खातं रिकामं

पुणे :- पाणीपुरवठा बंद होणार असल्याचा बनावट मेजेस पाठवून नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्याचा नवीन फंडा सायबर चोरट्यांनी शोधून काढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागांतील नागरिकांना असे मेसेज प्राप्त झाले असून, यातून काही नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याबाबत दोन ते तीन नागरिकांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरटे महापालिकेच्या नावाने नागरिकांना पाणीपुरवठा बंद होणार असल्याचा मेसेज पाठवत आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नावाने हे संदेश पाठवले जात आहेत. मागील महिन्याचे बिल न भरल्यामुळे पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याचे मेसेजमध्ये सांगितलेले असते. हा मेसेज मिळाल्यानंतर नागरिक भीतीपोटी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधतात. त्यानंतर सायबर गुन्हेगार विश्वासात घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत.
सायबर गुन्हेगार नागरिकांकडून संपर्क साधल्यानंतर त्यांना प्रलंबित पाणीपट्टी भरण्यास सांगतात. व्हॉट्सअॅपद्वारे एक ‘फाइल’ पाठवली जाते. ही ‘फाइल’ डाउनलोड केल्यानंतर मोबाइलमध्ये व्हायरसचा शिरकाव होतो. यातून सर्व डेटा हॅक केला जातो. बँक खात्यातील संवेदनशील माहितीची चोरी केली जाते. काही वेळातच नागरिकांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम परस्पर काढली जाते किंवा ऑनलाइन पैसे वळवले जातात.
विश्वास ठेवू नका
पाणीपुरवठा बंद करण्यासंबंधी कोणत्याही प्रकारचा ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉट्सअॅप’ संदेश महापालिकेकडून पाठवला जात नाही. प्रलंबित पाणी बिलाची अधिकृत माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भातील कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा; तसेच अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन प्रलंबित बिलाबाबत खात्री करावी, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
फसवणूक झाल्यास येथे साधा संपर्क
जर कोणी अशा फसवणुकीला बळी पडले असेल, तर तातडीने खालील ठिकाणी संपर्क साधावा.
सायबर गुन्हे तक्रार नोंदणीसाठी पोर्टल :- www.cybercrime.gov.in
सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर : १९३०
जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर गुन्हे शाखेत तक्रार नोंदवा.