छत्तीसगडमधून चोरी करून तुमसरमध्ये दुचाकी विक्री; असा झाला भांडाफोड

भंडारा :- वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी करायची. यानंतर नंबर प्लेट बदलवून त्यांची कमी किमतीत विक्री करण्याचा त्याचा धंदा सुरु होता. दरम्यान पोलिसांना याबाबत मिळालेल्या माहितीवरून त्याचे मोबाईल लोकेशन घेत त्याला भंडारा जिल्ह्यातील बुटीबोरी हिंगणा येथून ताब्यात घेतले आहे. यात आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या चोरीच्या सर्व दुचाकी छत्तीसगड राज्यातून चोरल्याचे समोर आले आहे.
छत्तीसगड राज्यातून दुचाकी चोरून त्या तुमसर येथे आणून त्यांच्या नंबर प्लेटवर भंडारा जिल्ह्याच्या रजिस्ट्रेशन कोड लिहून विक्री करणाऱ्या आंतरराज्य दुचाकी चोरट्याला तुमसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. वाल्मीकी उर्फ बालू लोकचंद हरीणखेडे (वय ४२) असे त्याचे नाव असून तो पाथरी (ता. गोरेगाव, जि.गोंदिया) येथील आहे. झटपट पैसे कमविण्यासाठी त्याने दुचाकी चोरी करण्याचे सुरु केले होते.
मोबाईल लोकेशनवरून घेतले ताब्यात
दरम्यान भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील हॉटेल, शिव भोजन केंद्र व इतर गर्दीच्या ठिकाणी आपली ओळख सांगून वाल्मिकी हा जुन्या दुचाकी कमी किमतीत विक्री करायचा. याबाबत काहींना संशय आल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर तुमसर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. तर मोबाइल लोकेशन ट्रेस करून त्याला बुटीबोरी हिंगणा येथून ताब्यात घेतले आहे.
तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी वाल्मिकी यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. ज्यांची किंमत २ लाख ९० हजारांची असल्याचे सांगितले जाते. वाल्मीकी हा छत्तीसगड राज्यातील दुचाकी चोरी करून तुमसर शहरात आणायचा. येथे भंडारा एम.एच. ३६ अशी नंबर प्लेट तयार करून स्थानिक लोकांना विक्री करीत होता. यात किती लोकांना फसविले याचा तपास सुरू आहे.