महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
अमरावती :- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेच्या जमील कॉलनी येथील मनपा उर्दु हायस्कुल, नूर नगर येथील मनपा उर्दु उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्र.९ व प्रविणनगर येथील मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.१८ व महानगर पालिकेच्या सर्व शाळा येथे मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, श्री.काजी विषय साधन व्यक्ती तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुधीर धोत्रे श्री.सईद सर, मो.जावेद, विषयतज्ञ निजामुद्दीन काझी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वाचन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये शाळेने पुस्तकांची सुंदर अशी गोलाकार रांगोळी तयार केली होती. त्या भोवती विद्यार्थ्यांनी बसून पुस्तकांचे वाचन केले. तसेच दालनामध्ये शाळेत उपलब्ध असलेले भाषेचे विश्वकोश खंड बारा, तेरा व चौदा हे ठेवण्यात आले होते.
तसेच विविध टेबलावर विविध प्रकारचे पुस्तकांचे वेगवेगळ्या प्रकारची रचना करण्यात आली होती. त्यामध्ये ऐतिहासिक पुस्तके, छोट्या मुलांच्या गोष्टी, वैज्ञानिक पुस्तके, छोट्यांच्या मनोरंजनात्मक गोष्टी, वीरांच्या कथा, स्वतंत्र लढ्याच्या गोष्टी, अशा प्रकारची रचना करण्यात आल्या होत्या. त्याचा शाळेतील विद्यार्थ्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना शाळेतील उपलब्ध पुस्तकांचा वाचनासाठी जास्तीत जास्त उपयोग घेण्याचे आवाहन केले. तसेच शाळेच्या ह्या अभिनव उपक्रमकरिता मुख्याध्यापक सुधीर धोत्रे व संपूर्ण शिक्षक वृंद यांचे कौतुक केले.
त्याचप्रमाणे वर्गा वर्गामध्ये डिजिटल बोर्डवर कुसुमाग्रजांचा परिचय, मराठी मुलाखती तसेच मराठी साहित्य संमेलनातील भाषणे इत्यादींचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. फलक लेखनाबद्दल कु. चैताली टोबरे यांचे विशेष कौतुक केले. तसेच सर्व वर्गांना मान्यवरांनी भेटी देत मुलांचा उत्साह वाढविला. तसेच शाळेतील उपलब्ध सर्व सुविधांचा पुरेपूर फायदा परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत दाखल करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.
यावेळी शाळेतील सहा.शिक्षक चैताली टोबरे,वैशाली महाजन, भाग्यश्री ढोमणे, रहीम खान, प्रीती भोकरे, वैशाली केने, गौरव परणकर व विद्यार्थी उपस्थित होते.