LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्यातील दुष्काळ संपविण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान संचालक ई.रविंद्रन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त विजय पाखमोडे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात जलजीवन निशन अंतर्गत २० हजार घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्या माध्यमातून सुमारे ८० लाख कुटुंबांना फायदा होत आहे. उर्वरित घरांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाबाबत चर्चा केली.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा दोनबाबत देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तीक शौचालयांबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये ‘हर घर जल’ अंतर्गत १०० टक्के नळ जोडणीचे उद्दीष्ट पूर्ण करावे. शाळा, अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!