आईस्क्रिम आणायला गेली, तरूणानं जबरदस्ती पकडलं, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

पुणे :- पुण्यातील स्वारगेट परिसरातील तरूणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेमुळे नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. आईस्क्रिम आणण्यासाठी गेलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीवर एका १९ वर्षीय तरूणानं लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. ही धक्कादायक घटना वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न एका १९ वर्षीय नराधम तरूणानं केला आहे. पीडित मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाशिम शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी गेली होती. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी घरी काही परतली नाही. बराच वेळ ती घरी परत न आल्यानं तिच्या आईनं वडिलांना चौकशी करण्यास सांगितलं. वडिलांनी दुकानात चौकशी केली. दुकानदारानं मुलगी इथं आली नसल्याचं सांगितलं.
यामुळे पालकांना मुलगी गेली कुठं? ही चिंता सतावत होती. संशय आल्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी दुकानात वाकून पाहिले. तेव्हा मुलगी त्याठिकाणी असल्याचं निर्दशनास आलं. तेव्हा वडिलांना आरोपी मुलीसोबत संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यामुळं पीडितेच्या वडिलांनी आईला बोलावून संबंधित प्रकार दाखवला.
पीडित मुलीच्या वडिलांनी तातडीने ११२ वर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत शहर पोलिसांकडे सुपूर्द केले. या घटनेनंतर परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.