नागपूरमध्ये 47 लाखांचा गुटखा नाश, विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ

नागपूर :- नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 47 लाख 54 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा नष्ट केला आहे. ही कारवाई नागपूर शहरातील परीमंडळ क्र. 5 मधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जप्त केलेल्या मुद्देमालावर करण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा गुटखा नष्ट करण्यात आला आणि त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीस बंदी असूनही अनेक ठिकाणी हे उत्पादन मोठ्या प्रमाणात साठवून विकले जात आहे. नागपूर शहरातील परीमंडळ क्र. 5 अंतर्गत येणाऱ्या कळमना, नवीन कामठी, जुनी कामठी, पारडी, यशोधरानगर, जरीपटका, कपिलनगर आणि कोराडी पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखू जप्त केला होता.
पोलिसांनी मिळून एकूण 47 लाख 54 हजार 221 रुपयांचा मुद्देमाल भांडेवाडी डंपिंग ग्राउंड येथे जाहीरपणे नष्ट केला. विशेष म्हणजे, ही कारवाई विद्यार्थ्यांच्या समक्ष करण्यात आली आणि त्यांना व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली.
ही महत्त्वपूर्ण कारवाई नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, अप्पर पोलीस आयुक्त प्रमोदकुमार शेवाळे तसेच पोलीस उपआयुक्त निकेतन कदम यांच्या देखरेखीखाली पार पडली.
या मोहिमेत सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार, विशाल क्षिरसागर आणि परीमंडळ क्र. 5 मधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गुटखा आणि तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे समाजातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी या व्यसनांपासून दूर राहावे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
नागपूर पोलिसांची ही कारवाई केवळ गुटखा विक्रेत्यांसाठी धडा नाही, तर नव्या पिढीला व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणारी आहे. गुटखा आणि तंबाखूविरोधी मोहिमेच्या माध्यमातून समाजाला आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरेल. अधिक माहितीसाठी राहा आमच्यासोबत.