राजापेठ बस स्थानक असुरक्षित! सिटी न्यूज विशेष रिपोर्ट

अमरावती :- पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका युवतीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर महाराष्ट्र हादरला!
पण तरीही, अमरावतीतील राजापेठ बस स्थानकाची सुरक्षा रामभरोसे आहे! सिटी न्यूजच्या विशेष पाहणीमध्ये समोर आलेल्या धक्कादायक बाबींमुळे प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. बस स्थानकात एकही सीसी टीव्ही नाही, मध्यरात्री संपूर्ण परिसर निर्जन आणि असुरक्षित आहे! कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना, प्रवाशांचे प्राण धोक्यात असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले!
सिटी न्यूजच्या टीमने मध्यरात्री 1 वाजता राजापेठ बस स्थानकाची पाहणी केली आणि धक्कादायक वास्तव समोर आले! संपूर्ण बस स्थानक ओसाड पडलेले, स्टीलच्या बाकड्या रिकाम्या, प्रवासी नाहीत, आणि एकही सीसी टीव्ही कॅमेरा कार्यरत नाही! याचा थेट अर्थ, जर काही अनर्थ घडला, तर कुणालाही पुरावा मिळणार नाही! प्रशासनाचा हा गंभीर निष्काळजीपणा लक्ष वेधून घेतो.
पुण्यातील घटनेनंतर पोलिसांनी येथे पेट्रोलिंग सुरू केले असले तरी, केवळ एक माजी सैनिक सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. अशा परिस्थितीत, जर मोठ्या गुन्हेगारी घटना घडल्या, तर जबाबदारी कोणाची? लांब पल्याच्या बसेस या स्थानकातून ये-जा करतात, त्यामुळे येथे प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, सुरक्षा व्यवस्थेचा पत्ता नाही! प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रशासन मोकळे झाले आहे!
राजापेठ बस स्थानकात सीसी टीव्ही नसल्यानं येथे कोणीही सुरक्षित नाही!
आज जर कोणत्याही महिला प्रवाशावर हल्ला झाला, तर त्याचा कोणताही पुरावा प्रशासनाकडे नसेल!
पुण्यात घडलेल्या भयानक घटनेनंतर देखील MSRTC व्यवस्थापन झोपेत आहे का?
अमरावतीकरांनी एकत्र येऊन राजापेठ बस स्थानकात त्वरित सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करावी लागेल!
नाहीतर येथे देखील पुण्यासारखी भयावह घटना घडली तर जबाबदारी कोणाची?
प्रशासन जागे होणार की अजून कोणीतरी बळी गेल्यावरच?