विद्यापीठात ‘ऊर्जा, पाणी आणि पर्यावरण संवर्धनावर’ राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
अमरावती :- संत गाडगे अमरावती विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात पीएम-उषा योजनेअंतर्गत आणि युजीसी-एमएमटीटीसी यांच्या सहकार्याने ‘ऊर्जा, पाणी आणि पर्यावरण संवर्धन आणि शाश्वतता’ या विषयावर नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी तथा प्रमुख वैज्ञानिक म्हणून सीएसआयआर-नीरी, नागपूरचे डॉ. नितीन लाभसेटवार, डॉ. पियुष कोकाटे, डॉ. हर्षवर्धन सिंग, डॉ.जी.के. खडसे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, कार्यक्रमाच्या समन्वयक तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार व मालवीय मिशन टिचर्स ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. मोहम्मद अतीक उपस्थित होते.
डॉ. नितीन लाभसेटवार यांनी ऊर्जा व्यवस्थापन, वायू प्रदूषण, जीवनचक्र मूल्यांकन, कार्बन क्रेडिट, वैयक्तिक ऊर्जा परीक्षण आणि स्वच्छतेच्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल उदाहरणासह माहिती दिली. डॉ. हर्षवर्धन सिंग यांनी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) द्वारे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वतता यावर प्रकाश टाकला. त्यांनी कोणत्या शा·ात पद्धतींचा अवलंब करावा, यावर लक्ष केंद्रीत करुन पर्यावरण, आर्थिक व सामाजिक या त्रिमितीतील शा·ातता स्पष्ट केली. शा·ात विकासासाठी संसाधने, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था बदलणे आवश्यक असल्याचे सांगून इ.आय.ए. कार्यपद्धती, प्रकल्प आणि त्याचे परिणाम याप्रसंगी विषद केले. डॉ.जी.के. खडसे यांनी जलस्त्रोत, त्यांचे व्यवस्थापन आणि संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. जलसंधारणाबरोबरच मृदसंधारणाकडेही लक्ष देण्याची गरज असून पीक व्यवस्थापन व वनसंवर्धनाचा विचार व्हायला हवा. भूजलातील पाण्याचा वापर कमी करुन जलस्तर वाढविण्याचा प्रयत्न व्हावा, याशिवाय रिसायकल जास्तीतजास्त व्हायला हवे, त्यामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
प्रमुख वैज्ञानिक डॉ. पियुष कोकाटे यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्यावरण देखरेख आणि विविध प्रकारच्या सेन्सरच्या डिझाइनमध्ये वापर तसेच पर्यावरणीय मूल्यांकनाशी संबंधित उद्दिष्टांनुसार सेन्सर कसे डिझाइन करावेत, याबद्दल सविस्तर माहिती दिली. हार्डवेअर साधने जसे की सेन्सर आणि मॉनिटरिंग स्टेशन्स तसेच सॉफ्टवेअर साधने जसे की ए.आय. एम.एल. टूल्स यांचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, भारतात शहरांमध्ये पर्यावरण प्रदूषणाचे परीक्षण करण्यासाठी 350 हून अधिक एन.ए.ए.क्यु.एम.एस. प्रणाली स्थापित केल्या असून ड्रोनचा वापर करून मानवी पोहोच नसलेल्या विविध उंचीवर हवा आणि पाण्याची नमुने गोळा केले जातात. हवा गुणवत्ता, तापमान, आद्र्रता, पाण्याची गुणवत्ता आणि मातीची आद्र्रता यांसारखा डेटा गोळा केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोर म्हणाले, सर्व व्याख्याने आणि प्रात्यक्षिके प्रेरणादायी, अंतर्दृष्टीपूर्ण, उत्साहवर्धक, मनोरंजक आणि माहितीपूर्ण होती. या कार्यशाळेतून जागरूकता, शाश्वत पद्धती, पर्यावरण संवर्धन आणि हरित गृहासाठी वचनबद्धता यांसारख्या नवीन कल्पना समोर आल्यात. कार्यशाळेत ऊर्जा, पाणी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून भविष्यातील शाश्वत विकासासाठी त्यांची जपणूक करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समन्वयक आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वर्षा नाठार यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय करून दिला. संचालन डॉ.के.सी. मोरे यांनी, तर आभार डॉ. प्रशांत गावंडे यांनी मानले. महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांच्यासह एकूण 320 सहभागींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.