लोकसहभागाचा आदर्श: नागापूर ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन, गावाच्या विकासासाठी 51 लाखांचा निधी

येवतमाळ , नागापूर :- गावाचा विकास हा फक्त सरकारी योजनांवर अवलंबून नसतो, तर त्यामध्ये लोकसहभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. उमरखेड तालुक्यातील नागापूर गावाने याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर गावाचा संपूर्ण कायापालट झाला असून, याची दखल स्वतः पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली आहे. नागापूर ग्रामपंचायत भवनाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री महोदयांनी गावाला 51 लाखांचा निधी जाहीर केला. पाहुयात हा संपूर्ण रिपोर्ट.
उमरखेड तालुक्यातील नागापूर गावाने लोकसहभागाच्या जोरावर विकासाची नवी वाट दाखवली आहे. गावातील लोकांनी स्वतः पुढाकार घेत ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबवले. आज याच नागापूर ग्रामपंचायत भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी गावकऱ्यांनी उभारलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली आणि नागापूरच्या विकास कार्याचे कौतुक केले.
नागापूर गावाने आदर्शवत काम केले आहे. व्यायामशाळा, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, पाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा आणि आदर्श शाळा अशा विविध क्षेत्रांत गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या सर्व कामांचा सकारात्मक परिणाम संपूर्ण गावाच्या विकासावर झाला आहे. या गावाच्या पुढील विकासासाठी आम्ही 51 लाखांचा निधी मंजूर करत आहोत.” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी संकल्पबद्ध विकास आराखडा तयार करून विविध योजनांचा प्रभावी अमल केला. गावात स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्यात आले असून, शासकीय इमारतींची उत्तम देखभाल कशी करावी याचे उत्तम उदाहरण येथे पाहायला मिळते. याचबरोबर स्थानिक शाळांना स्मार्ट बनवण्यावर भर देण्यात आला आहे. गावातील पाणी व्यवस्थापन प्रणालीही प्रभावीपणे कार्यरत आहे.
नागापूर गावाचा हा बदल खरंच प्रेरणादायी आहे. शासनाच्या मदतीपेक्षा लोकसहभाग आणि स्वयंप्रेरणेने गावाचा विकास शक्य आहे, हे या उदाहरणातून स्पष्ट होते. अन्य गावांनी देखील नागापूरच्या या यशस्वी प्रयोगातून प्रेरणा घ्यायला हवी. पुढील काळात या निधीतून नागापूरचा आणखी विकास होईल, अशी अपेक्षा आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत राहा City News !