नागपूरच्या अंबाझरी बायपास रोडवर दोन सराईत गुन्हेगार ताब्यात – अवैध शस्त्रांसह मोठा मुद्देमाल जप्त!

नागपूर :- नागपूर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून अंबाझरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. अंबाझरी बायपास रोडवर संशयित हालचाली करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाहुयात संपूर्ण वृत्तांत…
अंबाझरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पेट्रोलिंग दरम्यान, 2 मार्च रोजी पहाटे 2:35 वाजता, अंबाझरी बायपास रोडवर दोन संशयित इसमांना पाहिले. पोलिसांना पाहून ते पळू लागले, मात्र, तत्काळ कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान, हे दोघे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडे एका सिल्व्हर रंगाच्या अॅक्टीव्हा गाडीची कागदपत्रे नव्हती. गाडीची डिक्की उघडल्यावर त्यामध्ये लोखंडी काळ्या रंगाची पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता. याशिवाय, मोबाईल आणि इतर मुद्देमालासह एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी चंद्रेष उर्फ चंदू किसन हटेवार (वय 38) आणि नवीन उर्फ चिंटू रवी गुलहाने (वय 25) हे दोघे नागपूर शहरातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत कलम 3+25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्याकडून एक सिल्व्हर रंगाची अॅक्टीव्हा गाडी, दोन मोबाईल आणि पिस्तूलसह एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.