अमरावती SRPF क्वार्टरमध्ये धाडसी दरोडा – १२ घरं फोडली, पोलिसांचे कुटुंबच असुरक्षित!

अमरावती :- जे पोलिस आपल्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र झटतात, त्यांच्या घरातच चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) वसाहतीत तब्बल १२ क्वार्टर फोडण्यात आली आहेत.या घटनेमुळे पोलिसांच्याच कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आली आहे! पोलिसांवरच दरोडेखोरांचे सावट आले आहे का?
चला, पाहुया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट:-
सोमवारच्या रात्री अमरावती SRPF गट क्रमांक ९ च्या वसाहतीत चोरीचा मोठा प्रकार घडला.नवीन ५, ८ आणि ९ क्रमांकाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या SRPF जवानांच्या क्वार्टरमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली.या चोऱ्यांमध्ये जवान ईश्वर झाडे आणि पकडे यांच्या घरात सर्वाधिक मुद्देमाल चोरीला गेला आहे.सोने-चांदीसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या वसाहतीत SRPF जवानांचा दिवस-रात्र चोख बंदोबस्त असतो. तरीही चोरटे १२ क्वार्टरमध्ये शिरले!
ड्युटीवर गेलेल्या जवानांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे, काही घरात कुटुंबीय झोपलेले असतानाही चोरी झाली! ५ क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये नवीन भरती झालेले जवान राहत असल्याने चोरट्यांना काहीही मिळाले नाही. रात्री ड्युटी संपवून परतलेल्या एका जवानाने शेजारचे क्वार्टर उघडे पाहिले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन सर्व १२ क्वार्टरची पाहणी करण्यात आली.घरातील कपाटे उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते, त्यामुळे मोठ्या चोरीचा अंदाज आला.
याची माहिती तात्काळ फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पंचनामा करण्यात आला. पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला.राज्यातील नक्षल प्रभावित भागात सेवा देणारे SRPF जवान राज्यात दंगा नियंत्रणासाठी सज्ज असतात. मात्र, त्यांच्या कुटुंबाचीच सुरक्षा धोक्यात आल्याचे ही घटना दाखवते! जे नागरिकांचे रक्षण करतात, त्यांचेच घर सुरक्षित नाही, हे अत्यंत गंभीर आहे!
नागरिकांच्या घरात दरोडे पडण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत, मात्र पोलिसांच्याच वसाहतीत मोठा दरोडा पडणं, ही धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी बाब आहे! जर पोलिसांचे घरच असुरक्षित असेल, तर सर्वसामान्य नागरिक काय करतील? या चोरीच्या घटनेने SRPF जवानांचे मनोबल खचले आहे. आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार? पाहत राहा City News !