लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातील जऊळका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकाश करणे या तरुणाने मुलीला प्रेम व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला राजस्थानच्या पाटण येथून अटक केली आहे.
पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश करणे आणि अल्पवयीन मुलीची ओळख होती. आरोपीने तिला प्रेमाचे जाळे दाखवत लग्नाचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून मुलगी त्याच्या नजरेत अडकली. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीला तिच्या राहत्या घरातून पळवून नेत राजस्थानातील पाटण येथे नेले. तेथेही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी जऊळका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्वरीत आपली पथके सक्रिय करून आरोपीचा मागोवा घेतला. राजस्थानच्या पाटण येथून आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर अत्याचार, पोस्को (POSCO) आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे जऊळका परिसरात मोठी खळबळ माजली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास जऊळका पोलीस करीत आहेत. पोलिसांनी स्थानिक नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही महत्त्वाची माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेने समाजात अस्वस्थता पसरली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.