बाबा केदारनाथचे दर्शन घेणे आता सोप्पे होणार, 9 तासांचा प्रवास फक्त अर्ध्या तासात होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रमांतर्गंत उत्तराखंडमध्ये सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंतचे 12.9 किमी लांबीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. रोपवेमुळं आता केदारनाथला जाणे सोप्पे होणार आहे. वृद्ध व्यक्ती किंवा हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तीना काही तासांतच केदारनाथला पोहोचता येणार आहे.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. सध्या केदारनाथ यात्रेसाठी 8 ते 9 तासांचा वेळ लागतो. मात्र रोपवे पूर्ण झाल्यानंतर 36 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या रोपवेमध्ये 36 लोकांची आसन क्षमता असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने केदारनाथ रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या रोपवे प्रकल्पावर साधारण 4,081 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
रोपवे सार्वजनिक आणि खासगी भागीदारीत प्रकल्प विकासित करण्यात येणार आहे. हे उन्नत ट्राय केबल डिटॅचेबल गोंडोला (3 एस) प्रकल्पावर आधारित आहे. ज्याची डिझाइन क्षमता 1,800 प्रति तास असणार आहे. तर, प्रतिदिन 18,000 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. पहाडी क्षेत्रात संपर्क व वाहतूक वाढवण्यासाठी हा रोपवे म्हणजे एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.
केदारनाथ मंदिरातपर्यंत जाण्यासाठी गौरीकुंडपासून 16 किमीचा रस्ता खडतर आहे. अनेक जण हा पल्ला चालत, घोडे, पालखी किंवा हेलीकॉप्टरने पूर्ण करतात. केदारनाथ हे उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील 3,583 मीटर उंचीवर वसलेल्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे मंदिर अक्षय तृतीया (एप्रिल-मे) ते दिवाळी (ऑक्टोबर-नोव्हेंबर) पर्यंत वर्षभर म्हणजेच 6 ते 7 महिने यात्रेकरुंसाठी खुलं राहते. या मौसमात साधारण 20 लाखाहून अधिक तीर्थयात्री येतात.
आणखी एक प्रकल्प
मंत्रिमंडळाने उत्तराखंडमध्ये गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जीपर्यंत 12.4 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 2,730.13 कोटी रुपये खर्च होणार आहेत. रोपवेमुळं 45 मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे. सध्या गोविंद घाट ते हेमकुंड साहिबपर्यंत जाण्यासाठी 19 किमीची यात्रा करण्यासाठी 12 तास लागतात. मात्र रोपवेमुळं हा प्रवास 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
केदारनाथ रोप वे जगातील सर्वात लांबीचा रोप-वे
केदारनाथ रोपवे हा जगातील सर्वाधीक लांबीच्या रोपवे पैकी एक आहे. याचे समुद्रसपाटीपासून 3,583 मीटर उंचीवर हा रोपवे बांधण्यात येणार आहे. एकदा का हा रोपवे पूर्ण झाला की भाविकांना अर्धा ते एक तासात केदारनाथला पोहोचता येणार आहे.