सोलापूरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; अमर पाटील आणि इतर नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

सोलापूर :- विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला शिंदे गटाकडून जोरदार धक्के दिले जात आहे. आता सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे भगदाड पडणार आहे. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी जि.प. तथा सदस्य अमर पाटील हे गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार शिवशरण पाटील,माजी आमदार रतीकांत पाटील हे माजी आमदार शिंदे गटाच्या वाटेवर आहेत अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. एकंदरीत पाहता सोलापूरच्या ठाकरे सेनेमध्ये शिंदे गटाने ऑपरेशन टायगर चालवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जिल्हाप्रमुख अमर पाटील हे ठाकरे सेनेत नाराज होते. पक्षाचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ हे संपूर्ण निवडणुकीदरम्यान दक्षिण सोलापूर मतदारसंघात फिरकले नाहीत, त्यांनी काही सहकार्य केले नाही, असा आरोप अमर पाटील समर्थकांनी करत त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत गोंधळ केला होता.
राजीनामा की हकालपट्टी?
ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी बुधवारी संध्याकाळी ६ वाजता पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर अर्ध्या तासातच अमर पाटील व माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत दोघांची हकालपट्टी केल्याचे पत्र शिवसेनेचे (उबाठा) सचिव विनायक राऊत यांनी काढले.त्यामुळे अमर पाटील आणि उत्तम प्रकाश खंदारे यांची हकालपट्टी केली का ,यांनी स्वतः राजीनामा दिला याबाबत संभ्रम कायम आहे.
ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख दोन माजी आमदार शिंदेसेनेत
अमर पाटील याना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४० हजारांच्या आसपास मते मिळाली होती. अमर पाटील यांच्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. दरम्यान, या तीन मोठ्या नेत्यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे नेते सोडून गेल्याने आता ठाकरे सेनची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभेच्या वेळी मविआमध्येही काही आलबेल नसल्याचे चित्र दिसले होते. त्यामुळे ठाकरे गटाला सोलापूर हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे.