अमरावती येथील विमानतळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देण्याची मागणी !

अमरावती, मोर्शी :- अमरावती येथून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने अमरावती विमानतळाची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण करून अमरावतीमध्ये अत्याधुनिक विमानतळ निर्माण होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी मिशन मोडवर कामे पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वास न्यावा व अमरावती विमानतळाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा संत परंपरेचे वैभव म्हणून ओळखले जात असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर फिरून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवत असल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव देश-विदेशात होत आहे. अशा महान विभूतींच्या कार्याचे चिरंतन स्मरण राहावे, यामुळे अमरावती येथील बेलोरा विमानतळाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.
शासनाला अमरावती येथील विमानतळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव देण्याचे भाग्य लाभणार आहे ही शासानासाठी फार मोठी आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. अमरावती जिल्हा ही संतांची भूमी म्हणून ओळखल्या जात असून संतांच्या कार्याची दखल घेऊन अमरावती विमानतळाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विमानतळ असे नामकरण केल्यास अमरावती विमानतळाला यातून एक वेगळी ओळख मिळणार आहे.
रुपेश वाळके