सामान्य माणूस हा महामानवांच्या कार्याचा केंद्रबिंदू – डॉ. रविंद्र मुंद्रे

अमरावती :- छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यदृष्ट¬ा एक समांतर नाते आहे. शिवाजी महाराजांची रयत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उपेक्षित माणूस हा समाज परिवर्तनाचा केंद्रबिंदू होता. चवदार तळ्याचा सत्याग्रह रायगडाच्या पायथ्याशी झाला आणि संविधानाची निर्मिती करतांना छत्रपतींचे स्वराज्य बाबासाहेबांच्या डोळ्यांसमोर होते. तसेच सामान्य माणसांच्या शेतातील भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, हा विचार छत्रपतींचा होता. म्हणूनच इतिहासाचा अभ्यास करताना या दोघांच्याही समाजकार्याचा समान धागा जोडता आला पाहिजे, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. रविंद्र मुंद्रे यांनी केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागातंर्गत एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या अभ्यासक्रमद्वारे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या दुसया सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते डॉ. राजेश मिरगे, तर अध्यक्षस्थानी डॉ. संदिप राऊत उपस्थित होते.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि वर्तमान समाज या विषयावर बोलतांना प्रमुख वक्ते डॉ. राजेश मिरगे म्हणाले, वर्तमान अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तौलनिक अभ्यास करण्याची गरज आहे. आज भरकटत जाणाया तरुणाईच्या डोक्यात छत्रपतींचे आणि बाबासाहेबांचे विचार व कार्य सळसळत राहीले पाहिजे, तेव्हाच एक नवा समाज निर्माण होईल, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. संदिप राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य, यावर आपले मनोगत व्यक्त केले.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संचालन प्रा. वैभव जिसकार यांनी, तर आभार प्रा. वृषाली जवंजाळ यांनी मानले. कार्यक्रमाला शकडो विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक वर्ग यांची उपस्थिती होती.