बार्शीटाकळी ऑनलाईन बेटिंग प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

अकोला :- आजच्या आपल्या बातमीमध्ये मोठा खुलासा! बार्शीटाकळी ऑनलाईन बेटिंग प्रकरणात अकोला पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. बॅंगलोर विमानतळावरून श्रीलंकेला पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यासाठी LOC (लुक आऊट सर्क्युलर) चा वापर करण्यात आला असून, ही अकोला जिल्ह्यातील पहिली मोठी कारवाई आहे.चला, संपूर्ण प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊया आमच्या रिपोर्टमध्ये!
दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठे ऑनलाईन बेटिंग रॅकेट उघडकीस आले होते. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने बार्शीटाकळीच्या येवता-कातखेड रोडवरील तीन मजली इमारतीवर छापा टाकला. येथे मोबाईल आणि लॅपटॉपच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध बेटिंग सुरू असल्याचे उघड झाले.
या छाप्यात एकूण ३३ आरोपींना अटक करण्यात आले. मात्र, दोन मुख्य आरोपी फरार होते. त्यातील एक महेश बाबाराव डिक्कर हा श्रीलंका आणि दुबईच्या बेटिंग नेटवर्कशी जोडलेला असल्याचे तपासात स्पष्ट झाले. तो दुबईमध्ये ऑनलाईन बेटिंग प्रशिक्षण घेत असल्याचेही समोर आले. त्यामुळेच पोलिसांनी तत्काळ त्याच्या पासपोर्टवरील माहिती घेऊन LOC (लुक आऊट सर्क्युलर) जारी केला.
अखेर, दिनांक ६ मार्च २०२५ रोजी बॅंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महेश डिक्कर श्रीलंकेला पलायन करण्याच्या तयारीत असताना सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर अकोला पोलिसांनी तत्काळ बॅंगलोर विमानतळावर पोहोचून आरोपीला अटक केली आणि आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १० मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीने नागपूर, चेन्नई, हैदराबाद आणि बॅंगलोर मार्गे दुबई आणि श्रीलंका प्रवास केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांची पुढील चौकशी सुरू असून, या प्रकरणातील अन्य आरोपींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अकोला पोलिसांनी केलेली ही मोठी आणि यशस्वी कारवाई! ऑनलाईन बेटिंग सारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांचे कठोर लक्ष असून, गुन्हेगार कितीही मोठे असले तरी कायद्याच्या हातून सुटू शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या प्रकरणातील पुढील तपास कसा होतो आणि आणखी कोणते खुलासे होतात, यावर आमची नजर राहील.