अमरावती महानगरपालिका द्वारा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
अमरावती :- जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
अमरावती महानगरपालिका महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, एन.यु.एल.एम. विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ८ मार्च,२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जागतिक महिला दिन निमित्ताने महिला सन्मानार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा.खासदार डॉ.अनिल बोंन्डे, खासदार बळवंत वानखडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवि राणा, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, दिपीका गायकवाड, धनंजय शिंदे, सुभाष जानोरे, अधिकारी वर्ग उपस्थित होते.
दिपप्रज्वलन करुनच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मा.नरेंद्र वानखडे उपायुक्त यांनी केले. त्यानंतर मा.खासदार डॉ.अनिल बोंन्डे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवि राणा, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी मनोगत मांडले.
एन.यु.एल.एम. विभागाचे सहकार्याने महिलांकरीता कर्ज मेळावा व विविध शासकीय योजनांचे माहितीचे स्टॉल आयोजित करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमरावती मध्यवर्ती कारागृह अधिक्षक किर्ती चिंतामणी, प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, विभागीय सहाय्यक आयुक्त नगरपरिषद प्रशासन गीता वंजारी यांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. यशस्वी उद्योजीका निता चौधरी, प्रतिभा खोपे, बेबी पवार, संगीता खोडे, रीतु किलेकर यांचाही सत्कार करण्यात आला. संत गाडगेबाबा प्रबोधनी (अभ्यासिका व ग्रंथालय) गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षा देवून शासकीय सेवेत विविध पद मिळविल्याबद्दल कु.लक्ष्मी तेलंग पीएसआय, कु. कोमल धुमनखेडे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), कु. चैताली शेंडे एमपीएससी महसूल सहायक, प्रतिक भेंडे (ग्रामसेवक) ZP वर्धा, निलेश बोहोरुपी अमरावती जिल्हा न्यायालय (शिपाई), शुभम भोवते अमरावती जिल्हा न्यायालय (शिपाई), राहुल वडाडे ग्रामविकास अधिकारी, अंकुश बांभळकर अमरावती जिल्हा न्यायालय, सागर खोब्रागडे एमपीएससी महसूल सहायक, निलेश मावळे GMC नागपूर/ एमपीएससी महसूल सहाय्यक यांचा सत्कार करण्यात आला.
महिला बचत गट, आशा वर्कर, मनपा ग्रंथालयाच्या मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे (समुहगान, नाटीका, एकांकीका व समुहनृत्य) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गणेश वंदना, स्वागतगीत, नारीशक्ती नृत्य, हिरकणी नृत्य (जगण हो न्हार झालंजी), सत्कार समारंभ, अंबेकृपा करी, सावित्रीच्या लेकी तु खरच स्वातंत्र्य आहे का, जोगवा नृत्य (उदो ग अंबे उदो), योगा नृत्य, झुलवा पाळणा शिवाजी महाराज नृत्य, फॅशन शो, देवीचा गोंधळ, तुरु तुरु चालु नको जाऊ नको लांब, कहतै पल खुदसे निकल, सर्वधर्मसमभाव नृत्य, पथनाट्य-स्त्री भृण हत्या, हुंडाबळी, सामुहीक नृत्य, वरसो रे मेघा, महिला आरोग्य तपासणी शिबीर, बचत गटाद्वारा निर्मित वस्तु व विक्री, शासकीय योजनांची माहिती स्टॉल हे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमात महिलांकरीता असणा-या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली होती. जागतिक महिला दिना निमित्त अमरावती महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. खासदार अनिल बोंन्डे यांनी अध्यक्षीय भाषणा करुन महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत या विविध कार्यक्रमास सहभाग घेण्याचे आवाहन करुन या उपक्रमाचे कौतुक केले. ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा योगदानाबाबत त्यांचे कौतुक केले जाते. २१ व्या शतकात महिलेने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली आहे. आर्थिक, शैक्षणिक, तांत्रिक, सामाजिक अशी अनेक क्षेत्रे प्रगतीसह सर केली आहेत. त्यांच्यासाठी हा अभिमानाचाच दिवस आहे. महिलांची प्रत्येक क्षेत्रातली कामगिरी आज उंचवणारी ठरली आहे. राष्ट्रीय पातळीवर योग्य प्रशिक्षणाच्या आधारे महिला यश मिळवू लागल्या आहेत. निर्णय क्षमताही त्यांची चांगली असून वैयक्तिक पातळीवर आर्थिक दृष्ट्या सक्षमही त्या होवू लागल्या आहेत.
खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले की, स्त्रियांमध्ये जन्मजात धीरोदात्तपणा व शिस्त हे गुण असतात. अडचणीतून मार्ग काढण्याचे कौशल्य असते. कुटूंबाच्या आर्थिक निर्णयात महिलाने सक्रीय सहभाग घेतल्यास कुटूंबाला अर्थ निर्भर होण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. महिला दिन हा महिलांकरीता खास दिन म्हणायला हवा. आजच्या महिलांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्याकरीता जास्तीत जास्त कष्टही घ्यायला हवेत. इतरांसाठी आपण आदर्श ठरावे अशा प्रकारचे कार्य आजच्या महिलांनी करण्याची गरज आहे. यावेळी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार सुलभाताई खोडके यांनी सांगितले की, समाजातील तळागाळातील होतकरु महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात महिला आघाडीने आघाडी घेतली आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सबलीकरणाच्या कार्यामध्ये महिला आघाडीने योगदान दिले आहे. शिवणक्लास, मेहेंदी काढणे, ब्युटी पार्लर, रांगोळी, इलेक्ट्रिक माळा तयार करणे, तिळगुळाचे तसेच मोत्याचे दागिने बनविणे, चॉकलेट तयार करणे, कुकींग क्लासेस, लोणची, पापड, चटण्यांची निर्मिती करणे अशा विविध व्यवसायांचे प्रशिक्षण तळागाळातील महिलांना दिले जाते. या आधारे या महिला स्वावलंबी होवून आर्थिक दृष्ट्या सक्षम होतात. आजचं वातावरण हे महिलांसाठी खूप चांगल आहे. कर्ज मिळण्याच्या सहज सुलभतेमुळे अनेक विविध उद्योगांच्या संधी आजमावण्याची संधी महिलांना लाभत आहे. महिलांनी धाडसाने स्वावलंबी होत उद्योग उभारला पाहिजे आणि यायोगे विकास साधला पाहिजे. यावेळी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार रवि राणा यांनी सांगितले की, जागतिक महिला दिन हा महिलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. विविध क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्याचा हा महिलांकरीता महत्वाचा दिवस आहे. ८ मार्चचा दिवस प्रत्येक महिलेकरीता प्रेरणादायी असाच ठरतो आहे. सर्व महिलांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर महिला अभिमानाने आपली कामगिरी उत्तमपणे पार पाडत आहेत. आपली कामगिरी नित्य उंचावत गरुडभरारी घेण्याच्या दिशेने महिला कार्यरत आहेत. यावेळी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आज ८ मार्च, जागतिक महिला दिन! हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीत मर्यादित न राहता शिक्षण, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत. आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊ, त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवू आणि एक समान व न्याय्य समाज घडवू. महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक संस्कृती असली पाहिजे. यावेळी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला महानगरपालिका महिला बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान विभाग सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन मनिषा शेंडे व रेणुका कापुसकर यांनी केले तर आभारप्रदर्शन महिला बाल विकास अधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम यांनी केले. स्वयंआधार प्रकल्पाच्या विधवा महिलांनी डिझाईन केलेल्या ड्रेसवर फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. बडनेरा येथे बेघर निवारा केंद्रातील बेघर महिलांनी सुंदर नृत्याचे सादरीकरण केले. जागतिक महिला दिना निमित्य अनेक रंगारंग कार्यक्रम व मान्यवर महिला मंडळीचा यावेळी सत्कार करण्यात आला.