स्वारगेट एसटी स्थानकात सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यातून चोरीची धक्कादायक घटना घडली

पुणे :- पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकांसह जिल्ह्यातील बहुतांश एसटी स्थानकांत सुरक्षा व्यवस्था खिळखिळी असल्याचे चित्र आहे. बलात्काराच्या घटनेनंतर स्वारगेट एसटी स्थानकात सुरक्षारक्षकांचा अहोरात्र पहारा लावलेला असताना आणि पोलिसांनी गस्त वाढवलेली असतानाही शनिवारी (आठ मार्च) पहाटे साडेपाच वाजता एका बसमधून प्रवाशाचा लॅपटॉप चोरीला गेला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बलात्काराच्या प्रकरसीनंतर स्वारगेट एसटी स्थानकात सुरक्षारक्षकांचा खडा पहारा नेमण्यात आला असून, पोलिसांनी गस्तही वाढली आहे. यामुळे उपद्रवी प्रवृत्तीच्या लोकांसह चोरट्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बसमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेने सर्व अपेक्षा फोल ठरल्या.
वाकड येथे राहणाऱ्या केतन मोरे या तरुणाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोरे हे सेनापटी बापट रस्त्यावरील एका कंपनीत नोकरी करतात. कंपनीने त्यांना कामासाठी लॅपटॉप दिला होता. शनिवारी पहाटे रायगड जिल्ह्यातील महाड या मूळ गावी जाण्यासाठी ते पत्नी आणि मुलासह वाकड येथून पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट एसटी स्थानकावर आले. महाडच्या बसचे तिकीट काढून ते कुटुंबीयांसह बसमध्ये बसले होते. त्यांनी जवळचे सामान आणि लॅपटॉप बॅग एसटीमध्ये वरील बाजूच्या कॅरिअरवर ठेवली. काही मिनिटांत बस सुटण्यासाठी सज्ज झाल्यावर मोरे यांनी सामानाची पडताळणी केली; त्या वेळी लॅपटॉप बेंग गायब असल्याचे समजले. बसमध्ये सर्वत्र शोध घेऊनही बॅग न सापडल्याने त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. उपनिरीक्षक बाळू शिरसाट या प्रकरणी तपास करीत आहेत.
पोलिस असूनही चोऱ्या
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा ‘सीआर मोबाइल पॉइंट’ आहे. या ठिकाणी दररोज पोलिसांची गाडी, कर्मचारी थांबलेले असतात. रात्रपाळीतील पथकाकडूनही गस्त घातली जाते. अशा कडेकोट पहाऱ्यातही चोरटे ‘सक्रिय’ असल्याचे दिसत आहेत. दत्तात्रय गाडे याने स्वारगेटमध्ये महिलेवर केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर तेथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.