धक्कादायक! नशेसाठी पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईच्या व्यसनाधीनतेचा धक्का

पुणे :– महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात ड्रग्ज, गांजा, दारु या व्यसनाच्या आहारी तरुणाई जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील व्यसनाधीनता सातत्याने समोर येत आहे. नुकतेच पुण्यातील गौरव आहुजा या विकृत आणि माथेफिरू तरुणाने केलेल्या कृत्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. नशा करण्यासाठी मागितलेले पैसे आईने न दिल्याने एका 27 वर्षीय तरुणाने सोसायटीतील रहिवाशांच्या 13 दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मला पैसे द्या नाहीतर मी सोयायटीत लावलेल्या तुमच्या दुचाकी पेटवून देईल, अशी धमकी त्याने आईला आणि लहान भावाला धमकी दिली होती. त्यानंतर, त्याने खरोखरच सोसायटीतील गाड्या पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून तो व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंबीयांनी देखील संताप व हतबलता व्यक्त केली आहे. तसेच, पोलिसांनी (Police) त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा तो आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन, असेही आरोपी तरुणाच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.
पिंपरीतील या सोसायटीत तरुणाकडून दुचाकी पेटविल्या जात असल्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने ही घटना उघडकीस आली. पिंपरी शहरातील पिंपळे निलख या उच्चभ्रू परिसरात असलेल्या मोरया क्षितिज बिल्डिंग, या सोसायटीमध्ये ही घटना घडली असून हे कृत्य, याच सोसायटीतील रहिवाशी स्वप्नील शिवशरण पवार नामक तरुणाने केले. यासंदर्भात रहिवाशांच्या फिर्यादीनंतर पोलिसात तक्रार दाखल झाली असून सोसायटीतील रहिवाशांनी या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी, आरोपी स्वप्नीलला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आपला मुलगा उच्चशिक्षित आहे. मात्र, तो व्यवसनाच्या आहारी गेला असल्याने असे कृत्य करतो, आणि पैसे नाही दिले तर कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे स्वतः स्वप्नीलच्या आईनेच पोलिसांना सांगितले. स्वप्नीलच्या या कृत्याने सध्या तरुणाई, पिढी कुठल्या दिशेने वाहवत जात असून त्यांचे प्रबोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
10 वर्षांपासून गांजा व दारुचे व्यसन
गांजा आणि दारुच्या व्यसनाच्या तो आहारी गेला आहे, यापूर्वी तीनवेळा त्याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकून त्याचे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे व्यसन सुटले नसून तो व्यसनासाठी वारंवार पैशाची मागणी करतो, दररोज तो 2 हजार रुपये देण्याची मागणी करतो. यापूर्वी देखील त्याने माझ्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील मी पोलिसांत तक्रार दिली होती, असे आरोपीच्या लहान भावाने माध्यमांशी बोलताना म्हटले.