नैसर्गिक रंग संस्कृती जपत, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात – प्रा.डॉ. दत्तात्रय रत्नपारखी
अमरावती :- भारतीय महाविद्यालयात “होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा” उत्साहात संपन्न अमरावती – भारतीय महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने होळीच्या पार्श्वभूमीवर “होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेकरिता प्रमुख अतिथी मार्गदर्शक प्रा. डॉ. दत्तात्रय रत्नपारखी, वनस्पतीशास्त्र विभाग नरसम्म्मा महाविद्यालय अमरावती, कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. दीपलक्ष्मी कुलकर्णी होत्या. कार्यशाळेचे संचालन कार्यशाळा समन्वयक प्रा. एलव्ही पवार यांनी तर अतिथींचा परिचय प्रा. विशाल वरघट यांनी उपस्थितांना करून दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. रत्नपारखी यांनी नैसर्गिक रंगांचे महत्त्व सांगून रासायनिक रंगांच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण केली. त्यांनी स्पष्ट केले की, बाजारातील रासायनिक रंग त्वचेवर दुष्परिणाम करतात, डोळ्यांची जळजळ वाढवतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्याउलट, नैसर्गिक रंग वनस्पतींपासून बनवले जात असल्याने ते शरीरासाठी सुरक्षित असतात. शिवाय, रासायनिक रंगांमुळे पर्यावरण, प्राणी आणि जलस्रोत प्रदूषित होतात, तर नैसर्गिक रंग त्यांच्या संवर्धनास मदत करतात.
डॉ. दीपलक्ष्मी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “सण उत्साहाने आणि आनंदाने साजरे करावेत, परंतु त्याचबरोबर पर्यावरणाचे आणि आरोग्याचे भान ठेवणेही महत्त्वाचे आहे. नैसर्गिक रंग वापरल्याने होळी खेळताना त्वचा व आरोग्य सुरक्षित राहते.
डॉ. स्वाती ठाकूर व एलव्ही पवार यांनी यांनी विद्यार्थ्यांना गुलाब, झेंडू, बीट, पालक, हळद, पळस, गोकर्ण, जास्वंद यांसारख्या फुलांपासून, पानांपासून आणि भाज्यांपासून रंग कसे तयार करता येतात, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्यांना सहकार्य डॉ.पल्लवी सिंग यांनी केले.कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रंग तयार करण्याच्या प्रक्रिया शिकल्या आणि अनुभवल्या. जसे हिरवा रंग हा पालक व कोथिंबीर पेस्ट करून, पिवळा रंग हा हळद व पळसाच्या मिश्रणातून, लाल रंग हा जास्वंदाच्या फुलापासून , गुलाबी रंग बीटच्या रसाचा वापर करून साध्य करता येतो. निळ्या रंगाकरिता गोकर्ण फुलाचा रस उपयोगात आणला जातो. विद्यार्थ्यांनी या रंगांचा स्पर्श अनुभवला आणि बाजारातील कृत्रिम रंगांपेक्षा हे रंग किती मऊ आणि सुगंधी आहेत, याची प्रचिती घेतली.
कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी स्वतः नैसर्गिक रंग तयार करून त्यांचा वापर करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवेदनशीलता वाढली आणि नैसर्गिक संसाधनांचा शास्त्रीय वापर कसा करावा, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी हा उपक्रम पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली. हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता व्यवसायिक संधीची जाणीव करून देणारा ठरला असे वक्तव्य राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. सुमेध वरघट यांनी केले.
याप्रसंगी संगणकशास्त्र विभागाच्या डॉ. भार्गवी चिंचमलातपुरे व डॉ. मीना डोईबाले उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या शेवटी डॉ. पंकजा चेडे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.