अरे संसार, संसार! गेल्या 10 वर्षापासून कुटुंबावर ट्रकमध्ये राहण्याची वेळ! डोळ्यात अश्रू आणणारी कहाणी!

जीवनाचा संघर्ष कोणालाच चुकला नाही. पण काहींचा संघर्ष ऐकून मनाला खूप वेदना होतात. अशाच एका कुटुंबाची व्यथा आपण जाणून घेऊया. गेल्या 10 वर्षापासून एका अख्या कुटुंबाने ट्रकमध्ये संसार मांडलाय. एक ट्रक चालक पत्नी आणि दोन मुलींसोबत ट्रकमधूनच संसाराचा गाडा ओढतोय. एकनाथ पवार आणि त्यांच्या पत्नी ललिता पवार आपल्या दोन मुलींचा ट्रक मध्येच राहतायत.
संघर्षमय जीवनाची कथा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जनुना गावचे रहिवासी असलेले एकनाथ पवार आणि ललिता पवार यांनी गेल्या दहा वर्षापासून आपल्या कुटुंबासह ट्रकमध्ये संसार मांडलाय. त्यांच्या तीन मुलींपैकी सात आणि पाच वर्षाच्या दोन मुली ही त्यांच्यासोबत असतात. आर्थिक परिस्थितीमुळे एकनाथ पवार यांची पत्नी ही त्यांच्या दैनंदिन गरजा आणि ट्रक चालवताना पतीला मदत करत असतात. नागपुरातील वडधामना परिसरात ट्रक लोडिंग करता आले असताना त्यांनी संघर्षमय जीवनाची कथा झी 24 तास समोर त्यांनी मांडली.. दोन वेळच्या पोट भरण्याकरता हे कुटुंब ट्रक मध्येच संसाराचा गाडा चालवतय.
वाहतूक पोलिसांकडून त्रास
नागपूर-पुणे -नागपूर दरम्यान मालाची वाहतूक करत असते. महिंद्रा कंपनीचा Furio 17 हा कर्ज काढून घेतलेल्या ट्रकचे हप्ते आणि दुसरीकडे कुटुंबाचे पालन पोषण करताना एकनाथ पवार यांची आर्थिक घडी बसवताना तारेवरची कसरत होते. त्यात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडूनही आपल्याला त्रास होत असल्याची व्यथा ते बोलून दाखवतात.
ट्रकमध्ये राहिल्याने पैशाची बचत
अशात ट्रकचा हप्ता कसा फेडायचा या विवनचनेते ते सातत्याने असतात. कुटुंबासोबत ट्रकमध्ये राहिल्याने पैशाची बचत होत असल्याचे ते सांगतात. कुटुंबासोबत असल्याने साधारणपणे ते मालवाहतूक महाराष्ट्रातील मार्गांवरच करतात. रस्त्याच्या कडेला राहून हे कुटुंब कधी तिथे स्वयंपाक बनवून जेवण करत असते आणि त्यांची पत्नी ही तिथेच मुलींचा अभ्यास घेत असते.
मुलींच्या शिक्षण, संगोपनाचे आव्हान
मात्र रस्त्यावर मुलींचा शिक्षण देणे आणि त्यांचे संगोपन करणे याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. मदतीच्या आशेवर असलेल्या पवार कुटुंबाला सरकार आणि सामाजिक संस्थांकडून मदतीची अपेक्षा आहे.