सोलापूरमध्ये कारचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात; १ महिलेचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

सोलापूर :- भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा पुढील टायर अचानक फुटल्याने कार अनियंत्रित झाली. चालकांकडून कारवर नियंत्रण मिळविता न आल्याने भरधाव कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मालवाहू गाडीवर जाऊन धडकली. यात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर – अक्कलकोट महामार्गारील हॉटेल वळसंग वाडा जवळ हा भीषण अपघात झाला. सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार अनियंत्रित झाली. यामुळे कार समोर उभ्या असलेल्या छोटा हत्ती या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाली आहे. तर पाचजण जखमी झाले आहेत.
जखमी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
सोलापूर- अक्कलकोट महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कुसूम भट्टा पाटील या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर कल्पना पाटील, बसवण्णा म्हेत्रे, शुभम राजेश सनगर, शोभा राजेश सनगर आणि भट्टा पाटील हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
या भीषण अपघाताचा थरार हॉटेलवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. अपघात इतका भीषण होता कि अनियंत्रित कार समोरच्या वाहनावर येऊन धडकल्यानंतर मालाने भरलेला टेम्पो देखील काही अंतरापर्यंत लोटला जाऊन पलटी झाला आहे. तर संपूर्ण परिसरात धूळ पसरली होती. दरम्यान आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले.