यवतमाळमध्ये भीषण अपघात: नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक | 25 प्रवासी जखमी

यवतमाळ :- नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला यवतमाळच्या हिवरी हेटी जवळ अपघात झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता हे दृश्य पाहणाऱ्यांचे काळीज थरारून उठले आहे.
जाणून घेऊया ही संपूर्ण घटना :
कोल्हापूर येथून नागपूरला जाणारी सैनी ट्रॅव्हल्स (MH 40 CM 5035) मध्यरात्री 3.30 वाजता हिवरी हेटी जवळ आली असता रॉंग साईटने येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात पुलाला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चुरडला गेला.
अपघातानंतर संपूर्ण परिसरात आरडाओरड सुरू झाली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. स्थानिक मदतगार संदीप चेके, सुखदेवराव साठे, ओंकार चेके, बबन चेके, अविनाश चेके, विशाल चेके, संतोष येवले, विनोद येवले आणि विनोद चेके यांनी तात्काळ मदत कार्यात भाग घेतला.
घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत कावरे, वाहतूक शाखेचे अधिकारी ज्ञानोबा देवकते आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना पाच रुग्णवाहिकांच्या मदतीने तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीवर परिणाम झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. ट्रॅव्हल्स चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का? यासंदर्भात चौकशी सुरू आहे.