फैजरपुरा पतसंस्थेच्या नावाखाली गोरगरीबांची फसवणूक – नागरिकांची परताव्याची मागणी
अमरावती :- फैजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सम्यक नागरी सहकारी पतसंस्थेकडून गोरगरीब नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.लाखो रुपये गुंतवलेल्या नागरिकांना आता त्यांचे पैसे परत मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती घेऊया आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये :
फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सम्यक नागरी सहकारी पतसंस्था काही वर्षांपूर्वी सुरु झाली होती. अनेक गोरगरीब नागरिकांनी आपल्या मेहनतीचे पैसे या पतसंस्थेत जमा केले. मात्र आता पतसंस्थेकडून पैसे परत देण्यास नकार दिला जात आहे. काही नागरिकांना खोटी पासबुकं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे.
यामुळे नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर फैजरपुरा पोलीसांनी पतसंस्थेच्या महिला चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही अनेकांना न्याय मिळालेला नाही. 24 मार्च रोजी फैजरपुरा पोलीस स्टेशन येथे नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आणि लवकरात लवकर पैसे परत मिळावेत अशी मागणी केली. आता प्रश्न हा आहे की गोरगरीब जनतेला न्याय मिळेल का? पतसंस्थेतील फसवणूक प्रकरणाची चौकशी कधी आणि कशी पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशा फसवणुकीच्या घटना उघडकीस येणं चिंताजनक आहे. सरकार आणि प्रशासनाने यावर त्वरित पावलं उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे. गोरगरीब जनतेला लवकरात लवकर न्याय मिळेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.City News वर पाहत राहा या प्रकरणाचे सर्व अपडेट्स.