गाण्यासाठी तब्बल ९९ टेक घेतले तरीही… सेटवर नाराज झाले संजय लीला भन्साळी
‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘ब्लॅक’, ‘रामलीला’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. बॉलीवूडचे परफेक्शनिस्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखलं जातं. भन्साळी सध्या त्यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहेत. यामध्ये मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, रिचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रींनी काम केलं आहे.
‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ या सीरिजमध्ये प्रेक्षकांना लाहोरची कथा पाहायला मिळते. यामध्ये रिचाने साकारलेल्या लज्जोच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्रीने सीरिजमध्ये एक डान्स सीक्वेन्स केला आहे. प्रत्यक्षात या सीक्वेन्ससाठी तिला ९९ टेक द्यावे लागले होते. याचं एकमेव कारण म्हणजे संजय लीला भन्साळींना या गाण्यात परफेक्शन हवं होतं.
रिचा चड्ढाने डान्स केलेल्या गाण्यात आकर्षक डान्स स्टेप्स, भावनिक संदर्भ आणि मद्यधुंद अवस्थेत डान्स करणारी नर्तिका असे सगळे हावभाव एकत्रित अपेक्षित होते. अशावेळी अचूक शॉट मिळेपर्यंत भन्साळी रिटेक घेत राहतात. रिचाने जेव्हा ‘हीरामंडी’साठी डान्स सीक्वेन्सचं चित्रीकरण चालू केलं तेव्हा एकावर एक टेक होत गेले आणि साहजिकच भन्साळीचा संयम सुटत होता. शेवटी ते प्रचंड संतापले होते. रिचा याबद्दल ‘गलाटा प्लस’शी संवाद साधताना सांगते, “भन्साळींना स्वत: शास्त्रीय नृत्याबद्दल ज्ञान आहे. ते स्वत: प्रशिक्षित डान्सर आहेत. त्यांना नृत्याची लय आणि नेमकेपणा माहीत होता. त्यामुळे अर्थातच त्यांना त्या डान्समध्ये परिपूर्णता अपेक्षित होती.”
गाण्याच्या चित्रीकरणाबाबत बोलताना रिचा पुढे म्हणाली, “कोरिओग्राफीमध्ये त्यांचं अगदी बारकाईने लक्ष असतं. त्या ९९ टेकमध्ये डोक्यावर जड फुलांच्या मुंडावळ्या, पायाची लकब या सगळ्या गोष्टी सांभाळून मला मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. त्यात आपण भन्साळी सरांना हवंय तसं नीट करत नाहीये याचा प्रचंड तणाव मला आला होता. त्यादिवशी ते ९९ टेक घेऊन मी प्रचंड थकले होते, रडत होते. पण, तरीही मला तो शॉट प्रामाणिकपणे नीट करायचा होता. शेवटी ९९ टेकनंतर सरांनी पॅकअप सांगितलं. याचा अर्थ त्यांना नव्याने व्यवस्थित तो शॉट शूट होणं अपेक्षित होतं. काही दिवसांनी भन्साळींनी पुन्हा या डान्स सीक्वेन्सचं चित्रीकरण करण्यास सुरुवात तेली. त्यावेळी मी केवळ २० मिनिटांत त्यांना हवा तसा शॉट दिला.”