दहा पदव्या संपादन करण्यापेक्षा एक उत्तम दर्जाचा शोधपत्र महत्त्वाचा – डॉ. न्याहाटकर

अमरावती :- दहा पदव्या संपादन करण्यापेक्षा एक उत्तम दर्जाचे संशोधनपत्र आयुष्याला दिशा देवू शकते, असा मौलिक सल्ला डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेजच्या डॉ. सिद्धांती न्याहाटकर यांनी दिला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत पी.जी डिप्लोमा इन कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश अभ्यासक्रमव्दारा आयोजित “शोध पत्रलेखन”या अतिथी व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर अध्यक्षस्थानी गीताई डेंटल केअरचे सी.ई.ओ. डॉ. राणा नंदकिशोर चिखले, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. न्याहाटकर यांनी संशोधनपत्राचा मसुदा यावर प्राध्यापकांशी चर्चेदरम्यान शोधपत्र लिहिताना वापरण्यात येणारा मसुदा कसा असावा, किती शब्दात व किती ओळीत लिहावा याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी डॉ. श्रीकांत पाटील यांनी याप्रसंगी प्राध्यापकांना शोधपत्र लिहिण्यासाठी प्रवृत्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राणा नंदकिशोर चिखले यांनी अत्यंत सोप्या भाषेत शोधपत्राचा मसुदा सांगतांना एखाद्या कार्यक्रमाच्या स्वरूपाप्रमाणे शोधपत्राचे स्वरूप असते, ज्याची सुरुवात परिचयाने, तर शेवट निष्कर्षाने होत असतो, असा सल्ला दिला. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन प्रा. मयूर विरूळकर, तर आभार प्रा. प्रणव तट्टे यांनी मानले. कार्यक्रमाला विभागातील प्राध्यापकवृंद मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.