पुसदमध्ये अवैध सावकारावर सहकार विभागाची धाड, ५८ संशयास्पद दस्तऐवज जप्त
पुसद – यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवैध सावकाराच्या घर आणि दुकानावर सहकार विभागाने एकाच वेळी छापा टाकत मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची जप्ती केली आहे. अवैध सावकारीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा प्रत्यय या कारवाईतून आला आहे.
शहरातील मामा चौक आणि सुभाष चौक येथे राहणाऱ्या अनिल मधुकर गडम या अवैध सावकारावर सहकार विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत जिल्हा निबंधकांच्या आदेशावरून पार पडली. पथकाने एकूण ५८ संशयास्पद दस्तऐवज जप्त केलेत. यामध्ये कोरे चेक, कोरे बॉन्ड, खरेदीखत, डायऱ्या, चिठ्ठ्या यांचा समावेश आहे. या सावकाराने शेतजमिनीवर बेकायदेशीररित्या खरेदीखत लिहून घेतले असल्याची तक्रार वैभव बोरकुट या शेतकऱ्याने १७ मार्च रोजी केली होती. या कारवाईदरम्यान पथकाला शक्यतो बोगस सावकारी व्यवहारांची संपूर्ण साखळी हाती लागली असून, पुढील तपास आता सुरू झाला आहे. या कारवाईचे नेतृत्व जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं. या धाडीत पोलीस व होमगार्डांचंही सहकार्य घेण्यात आलं. सावकारीचा हा धंदा केवळ आर्थिक फसवणूक नसून, शेतकऱ्यांच्या जगण्यावर घाला असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.