Crime : पत्नीच्या हत्येप्रकरणी नवरा तुरुंगात, बायको बाहेर बॉयफ्रेंडसोबत फिरतेय, मित्राने असा केला भांडाफोड

कर्नाटकातील म्हैसूर येथे घडलेला हा प्रकरण खरोखरच धक्कादायक आहे. चित्रपटाला साजेसा असा हा प्रकार समोर आला आहे. चार वर्षांपूर्वी अचानक एक महिला बेपत्ता झाली. तिच्या गायब होण्यामागे तिच्याच पतीचा हात असल्याचा संशय महिलेच्या कुटुंबीयांनी घेतला. आणि महिलेच्या पतीविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून पतीला अटक केली आणि तो गेली कित्येक वर्षे तुरुंगात आहे. या प्रकरणात न्यायालयात खटला देखील सुरू आहे. आणि आता या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट् आलाय. तुरुंगात असलेल्या व्यक्तीच्या मित्राने प्रवासादरम्यान एका ठिकाणी ती बेपत्ता महिला पाहिली. ती एक पुरुषासोबत होती, आणि दोघेही अगदी आरामात फिरत होते.
कुरुबारा मल्लिगे या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले होते, आणि सुमारे साडेचार वर्षांनंतर चक्क ती जीवंत सापडलीये. तिचा पती सुरेश याच्यावर तिच्या खूनाचा आरोप लावण्यात आला होता. मल्लिगेला तोब्यात घेतल्या नंतर तिने सांगितले की, सुरेश तिचा पहिला नवरा आहे. त्यांचे १८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आणि त्यांना दोन मुले देखील आहेत. मात्र, सध्या ती तिचा दुसरा पती गणेशसोबत कोडगु येथे राहत आहे.
१८ वर्षांपूर्वी मल्लिगा आणि सुरेशचे लग्न झाले होते. ते बसवनहल्लीतील कोडागु या गावात राहत होते. १९ ऑक्टोबर २०२० रोजी मल्लिगे अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश उठला तेव्हा मल्लिगे घरी नव्हती. काही आठवड्यांनंतर सुरेशने कुशानगर ग्रामीण पोलिस ठाण्यात मल्लिगे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
तिच्या कुटुंबीयांनी तिचा पती सुरेशवर हत्या केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही पुरावे गोळा केले. त्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सुरेशला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि तो सध्या तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले.
सुरेशचा मित्र एक दिवस कुठेतरी फिरायला गेला होता. प्रवासादरम्यान त्याची बस एका हॉटेलजवळ थांबली होती. तो हॉटेलमध्ये काही खाण्यासाठी गेला, पण तिथे जे काही त्यानं पाहिलं त्याला धक्काच बसला. तो घाबरून तिथून गेला. थोडा वेळ तो बाहेरच उभा राहिला आणि हॉटेलकडे पाहू लागला. तेवढ्यात, गुलाबी रंगाचा सूट घातलेली एक महिला त्या हॉटेलमधून बाहेर पडताना त्याला दिसली.
त्याने लगेच आपला मोबाईल काढून तिचा व्हिडिओ शूट केला आणि काही फोटो देखील काढले. हा व्हिडिओ त्याने पुरावा म्हणून सुरेशला दाखवला, जेणेकरून सुरेश त्या महिलेला ओळखू शकेल. यानंतर कोडगू पोलिसांनी १ एप्रिल रोजी त्या महिलेला, मल्लिगेला, ताब्यात घेतले. नंतर तिला म्हैसूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे तिच्या पतीच्या खुनाचा खटला सुरू आहे.
सुरेश विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना त्याला पोलिसांनी अटक का केली? सुरेशने केलेला दावा पोलिसांनी ऐकला नाही का? सुरेशच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाही का? या पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला असून, अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्याची उत्तरं अजूनही मिळाली नाहीत.