Nagpur Accident : भरधाव टिप्परची धडक, कार पानठेल्यात घुसून चक्काचूर, गॅरेज संचालकाचा चिरडून अंत

नागपूर : भरधाव टिप्परने मागून कारला धडक दिली. त्यानंतर टिप्पर कारसह काही अंतरावरील पानठेल्यात घुसला. या भीषण अपघातात मोहननगर येथील हसन गॅरेजचे संचालक जऊर हसन (वय ७७, रा. छावणी, सदर) ठार तर दोन जण जखमी झाले. ही थरारक घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. राजकुमार दुबे आणि सचिन यादव अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी टिप्पर मालक व चालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली. अविनाश रामचंद्र भोयर (वय २९, रा. कन्हान) असे अटकेतील चालकाचे नाव आहे.
कसा झाला अपघात?
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हसन हे एमएच-३१-ईए-९१९९ या क्रमांकाच्या कारने कळमेश्वरकडे जात होते. गोरेवाडा परिसरात मागून आलेल्या भरधाव टिप्परने (एमएच -४०- बीजी ८१९१) कारला धडक दिली. टिप्पर कारसह काही अंतरावरील पानठेल्यात घुसला. यात पानठेल्याजवळ उभे असलेले राजकुमार व सचिन जखमी झाले.
अपघातात कार चक्काचूर झाली. हसन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांना मिताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून हसन यांचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. जखमींनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी शोध घेऊन टिप्परचालकाला अटक केली. टिप्पर मालक इंद्रजित वहिले यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याचे टिप्परचालक पोलिसांना सांगत आहे.